मुंबई, 27 मार्च : आई कुठे काय करते या मालिकेत आता आईच्या म्हणजेच अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. देशमुख कुटुंबीयांनी मोठ्या धुमधडाक्यात अरुंधतीचं दुसरं लग्न लावून दिलं. आईच्या लग्नात तिच्या मुलांनीही चांगलीच धमाल केली. आशुतोष सोबत अरुंधतीने संसार थाटला आहे. आता तिच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असताना तिच्यासमोर मात्र नवं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे आईने नवा संसार थाटला असला तरी लेकाचं लग्न मात्र मोडणार आहे. आता मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट येणार आहे.
'आई कुठे काय करते' ची सध्या प्रचंड चर्चा आहे. मालिकेत सुरु असलेल्या कथानकामुळं सध्या सगळ्यांचंच लक्ष मालिकेवर वेधलं आहे. मालिकेत आई अरुंधतीचं दुसरं लग्न मुलांसहित सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नातही तिच्या कुटुंबीयांचा उत्साह पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. अरुंधतीच्या लग्नाला यशने सगळ्यात जास्त पाठींबा दिला. पण त्याच्या आयुष्यातील प्रेम मात्र त्याच्यापासून दुरावणार आहे. गौरीने यशबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.
आई कुठे काय करते मालिकेचा नवीन एपिसोड अपडेट समोर आला आहे. यामध्ये ईशा सगळ्यांना गौरीने यशसोबतचा साखरपुडा मोडल्याचं सांगते. हे ऐकून अप्पा आणि कांचनला चांगलाच धक्का बसतो. अनिरुद्ध या सगळ्याचा दोष गौरीला देतो. गौरीने फक्त यशासोबत टाईमपास केला. यश तिचं वेळ घालवण्याचं साधन होतं' असं म्हणत अनिरुद्ध चिडतो. तर लेकाचं लग्न मोडल्याने अरुंधती देखील चांगलीच दुःखी होते. तिला यशची काळजी वाटते.
View this post on Instagram
यशने काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून अरुंधती त्याला समजावते. ती त्याला म्हणते, 'तू फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी महत्वाचा आहेस. काहीही झालं तरी तुझी आई तुझ्यासोबत कायम असेल.' असं म्हणत आई यशला धीर देते. पण आता या सगळ्यातून पुढे काय घडणार ते पाहणं महत्वाचं आहे.
यश आणि गौरी यांच्यात अनेक दिवसांपासून खटके उडाले होते. अशातच अमेरिकेला गौरी अचानक अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुखांकडे येते. तिथेही यश गौरीला पाहून भावुक होतो. दोघांचं बोलणं होतं आणि यश तिला तुझा निर्णय झाल्याशिवाय तोंड दाखवू नको सांगतो. दरम्यान अरुंधतीच्या लग्नानंतर अचानक गौरी यशला सोडून अमेरिकेला निघून जाते. तसेच त्याला साखरपुड्याची अंगठी पण परत करते.
'आई कुठे काय करते' मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. पण मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे अरुंधतीसमोर पुन्हा नवं आव्हान उभं राहील आहे. आता या सगळ्यातून अरुंधती यशला कसं बाहेर काढते ते पाहणं महत्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.