मुंबई, o7 डिसेंबर : 'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच 'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट दाखवण्यात येत आहेत. नुकतीच मालिकेत आशुतोषची बालमैत्रीण अनुष्काची एंट्री झाली. दोघांच्या नात्यात अनुष्काच्या एन्ट्रीने अरुंधतीला आशुतोषवरील प्रेमाची खात्री पटली. अखेर आता अरुंधती आशुतोषवरील प्रेम कबूल करणार आहे. मात्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवीन संकट उभे ठाकणार आहे.
हेही वाचा - Dattajayanti : गौरीच्या जयदीपने साकारलीय दत्तगुरूंची भूमिका!; फोटो पाहून व्हाल अवाक
मालिकेच्या पुढच्या भागाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानुसार अरुंधती आणि आशुतोष एकमेकांबद्दल प्रेमाची कबूली देणार आहेत. पण ते बोलण्याआधीच अरुंधतीला जे दिसतं त्यामुळे मालिकेला नवीन वळण लागणार आहे. अरुंधती तिच्या मुलाला अभिषेकला एका दुसऱ्या मुलीसोबत पाहणार आहे. अभिषेक तिचा हात हातात घेऊन बसला आहे. हे पाहून अरुंधतीला चांगलाच धक्का बसतो. एकीकडे अनघा प्रेग्नेंट आहे तर दुसरीकडे अभिषेक दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
View this post on Instagram
आता अभिषेकचं सत्य समोर आल्यावर अरुंधती त्याला कसं तोंड देणार. अनिरुद्धाच्याच पावलावर पाऊल टाकणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाला अरुंधती रोखू शकणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या नव्या ट्विस्टमुळे मालिकेचं कथानक बदलणार आहे. या सगळ्यात आशुतोष अरुंधतीची साथ देणार का ते पाहण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
एकेकाळी टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात सध्या कमी पडली आहे. या आठवड्यात मालिकेत अनुष्काची झालेली एंट्री प्रेक्षकांना पसंत पडलेली दिसत नाही. मालिकेला या आठवड्यात 5.9 रेटिंग मिळाले असून तिचा क्रमांक थेट पाचव्या नंबरवर घसरला आहे. त्यामुळे मालिकेत येणाऱ्या या ट्विस्टमुळे टीआरपी वाढणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.