मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sushant Singh Rajput: अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली महापालिकेने त्याला दिली अनोखी आदरांजली

Sushant Singh Rajput: अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली महापालिकेने त्याला दिली अनोखी आदरांजली

sushant singh rajput news18 lokmat

sushant singh rajput news18 lokmat

21 जानेवारीला सुशांतसिंग राजपूत 35 वर्षांचा झाला असता. गेल्या वर्षी 14 जूनला मुंबईत तो मृत्युमुखी पडला. त्याच्या जन्मदिवसानिमित्त दिल्ली महापालिकेने एक मोठा प्रस्ताव संमत करून त्याला आदरांजली वाहिली

नवी दिल्ली,22 जानेवारी:  गेल्या वर्षी 14 जूनला सुशांत सिंह राजपूतचा धक्कादायक मृत्यू झाला. मुंबईत त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला आणि चित्रपटसृष्टीच नाही तर देश हादरला. गुरुवारी (21 जानेवारी) सुशांतसिंह (SushantSingh Rajput) 35 वर्षांचा झाला असता. त्याला आदरांजली म्हणून दिल्ली महापालिकेने एक अनोखा प्रस्ताव मांंडला आणि त्याला संमती दिली.

दक्षिण दिल्लीतल्या अँड्य्रूज गंज परिसरातल्या एका रस्त्याला लवकरच दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचं नाव देण्यात येणार आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने (SDMC) त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 14 जून 2020 रोजी तो मुंबईत बांद्रा इथल्या आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या पश्चात आलेल्या त्याच्या पहिल्या जन्मदिनी चाहत्यांनी, तसंच त्याच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर त्याच्या आठवणी जागवल्या. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूभोवती संशयाचं जाळं असून, त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याबद्दल अद्याप नेमकं काही स्पष्ट झालेलं नाही. अनेक गुंतागुंतीच्या घटना-घडामोडी आणि अनेक बड्या नावांचा समावेश असल्यामुळे या प्रकरणी हाय-प्रोफाइल तपास सुरू आहे.

दक्षिण दिल्ली महानगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे. सुशांतसिंह राजपूत याचं नाव एका रस्त्याला देण्यात यावं, असा प्रस्ताव दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे अँड्र्यूज गंज वॉर्डाचे काँग्रेस नगरसेवक अभिषेक दत्त (Abhishek Dutt) यांनी  सप्टेंबर 2020मध्ये मांडला होता. त्यांनी हा प्रस्ताव महापालिकेच्या रस्ते नामकरण आणि पुनर्नामकरण समितीकडे पाठवला होता.

'हा प्रस्ताव महानगरपालिकेच्या बैठकीत गुरुवारी मंजूर झाला आहे,' अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हे देखील वाचा - सुशांतच्या वाढदिवशी बहिणीची अनोखी श्रद्धांजली, केली 25 लाख रुपयांच्या स्कॉलरशिपची घोषणा

अँड्र्यूज गंज ते इंदिरा कॅम्प या रस्त्याला सुशांतसिंह राजपूत मार्ग असं नाव दिलं जाणार आहे. या रस्त्याचं सध्याचं नाव 'रोड नंबर एट' असं आहे. या रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांपैकी बहुतांश नागरिक मूळचे बिहारचे आहेत. सुशांतही मूळचा बिहारचा आहे. त्यामुळे या रस्त्याला सुशांतसिंह याचं नाव देण्याची मागणी त्यांच्याकडून होत होती, असं नगरसेवक दत्त यांनी पाठवलेल्या लेखी प्रस्तावात लिहिलं होतं. अखेर त्यांची ही मागणी मंजूर झाली आहे.

कोणीही गॉडफादर नसताना सुशांतसिंहने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा होता. त्यातच त्याचा अकाली आणि संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे त्याच्याबद्दल अधिक सहानुभूती निर्माण झाली आहे.

First published:

Tags: BJP, Delhi, Sushant sing rajput