नवी दिल्ली, 13 डिसेंबर : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान (A.R.Rehman) संगीत विश्वातील एक मोठं नाव. ए. आर. रेहमानचे फक्त भारतातच (India) नाही तर परदेशातही लाखो फॅन्स आहेत. ते सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहत नसले तरी त्यांच्या आयुष्यातील अपडेट्स ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. रेहमान यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. रेहमना यांची ही पोस्ट म्हणजे त्यांचं पोट्रेट (Portrait) आहे. त्यांच्या एका चाहत्याने तामिळ लिपीचा वापर करून रेखाटलं आहे. हे पोट्रेट रेहमना यांना इतकं आवडलं की त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर (Instagram) ते शेअर केलं आहे.
रेहमान यांच्या चित्रावरून हुबेहुब रेखाटलेलं आऊटलाईन स्केच हे या कलाकृतीचं वैशिष्ट्य आहे. ही कलाकृती म्हणजे एक भेट आहे. ही भेट संगीतक्षेत्रात अमूल्य असं योगदान देणाऱ्या रेहमान यांना सादर करण्यात आली आहे. तसंच ही कलाकृती अक्षरे, सुलेखन (Calligraphy), टायपोग्राफी (Typography) च्या माध्यमातून अधिक सुंदर दिसणाऱ्या तामिळ लिपीला देखील समर्पित आहे. टायपोग्राफ कलेत तज्ज्ञ असलेल्या एका कंपनीच्या टायपोग्राफीचा वापर करून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
ए.आर. रेहमान यांचं हे पोट्रेट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले शब्द म्हणजे त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांची नावं आहेत. या आर्टवर्कच्या तळाला चित्रकार तारिक अजीज असं नाव लिहिलं असून, या कलाकाराने कलाकृतीत तामिळ कॅलिग्राफीचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. तसंच या कलाकृतीला अधिक जिवंतपणा आणण्यासाठी काही रेषांचा देखील वापर त्यानं केला आहे. या चित्रामागील भागात काही अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे की चित्राकडे निरखून पाहिलं तर चर्मपत्राचा वापर केल्याचा आभास निर्माण होतो. शब्दकलेचा वापर करून रेखाटण्यात आलेल्या या चित्रातून जगविख्यात संगीतकाराचे व्यक्तिमत्व अधोरेखित होतं.
रेहमान यांनी हे चित्र पोस्ट करताच केवळ एक तासातच चित्राला 1.5 लाख लाईक्स मिळाले असून अनेक फॉलोअर्सने कमेंट देत या चित्राचं कौतुक केलं आहे. तसंच तामिळ टायपोग्राफीच्या निर्मात्यांनी ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ असं टॅग करीत त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरून हे चित्र शेअर केलं. तेथे देखील रेहमान यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव केला.
सुंदर कलाकृती अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने फोटो- व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॅर्मवरून (Photo – Video Shearing) दिली आहे. तर ईटस परफेक्ट ( Its Perfect) अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने या चित्राला दिली. तसंच अनेक चाहत्यांनी फायर (Fire) आणि हार्ट शेप (heart Shape) इमोजींचा (emoji) वापर करीत आपल्या लाडक्या संगीतकाराप्रती प्रेम व्यक्त केलं. काही चाहत्यांनी थलैवा (नेता किंवा बॉस) असे लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नुकतीच ए. आर. रेहमान यांची ब्रिटीश अॅकॅडमी फिल्म अॅवार्डसचे (BAFTA) ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाली आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘पोन्नी सिवन’ या तामिळ चित्रपटातील गाण्यांचा सध्या चाहते आनंद घेत असून त्यांचा ‘अतरंगी रे’ हा हिंदी चित्रपट फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार आहे.