चेन्नई, 28 डिसेंबर: भारताचे प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान (A.R. Rahman) यांच्या आईचं चेन्नईमध्ये निधन झालं. करीमा बेगम (Kareema Begum) असं त्यांच्या आईचं नाव होतं. स्वत: ए आर रेहमान यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. करीमा यांना वयानुसार तब्येतीच्या काही तक्रारी सुरू झाल्या होत्या. गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्यावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
करीमा बेगम यांचे पती आर के शेखर (R. K. Shekhar) स्वत: एक उत्तम संगीतकार होते. त्यांनी मुख्यत्वे मल्याळी सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. त्यांनी एकूण 52 चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम केलं. ज्यातले 23 मल्याळी होते. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ए. आर रेहमान यांनी सांगितलं होतं की, ‘माझ्यातल्या कलेला माझ्या आधीच आईने ओळखलं होतं. तिनेच मला प्रेरणा दिली होती.’ आईच्या निधनामुळे ए.आर रहमान भावुक झाले आहेत.
ए. आर रहमान पुढे सांगतात, ‘मी 9 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा माझी आई माझ्या वडिलांची वाद्य भाड्याने देऊन आमचं पालन पोषण करत असे. काही काळानंतर तिला वडिलांची वाद्य विकावीही लागली होती.’ मलादेखील संगीत क्षेत्रात पुढे जाण्याचं पाठबळ माझ्या आईकडूनच मिळालं होतं.