पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडचे हे 6 सिनेमे पाकिस्तानात होणार नाहीत प्रदर्शित
सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘भारत’ पाकिस्तानात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. या आत्मघातकी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. यात अजय देवगणनेही त्याचा आगामी ‘टोटल धमाल’ सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी २२ फेब्रुवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा ‘लुका- छुपी’ सिनेमाही पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार नाही. १ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या निर्मात्यांनी पाकिस्तानात सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पुलवामा हल्ल्यानंतर आता सुशांत सिंग राजपूतचा ‘सोनचिडिया’ सिनेमाही पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. येत्या १ मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित न होणाऱ्या यादीत मौनी रॉय आणि राजकुमार राव यांचा ‘मेड इन चायना’ सिनेमाचाही समावेश आहे. मेडॉक्स फिल्म्सने त्यांचा कोणताच सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित जुगराज दिग्दर्शित दिलजीत दोसांजचा रोमँटिक- कॉमेडीपट अर्जुन पटियाला येत्या ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमाही पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार नाही.

सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘भारत’ पाकिस्तानात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सलमानने नुकतेच आतिफ असलमला त्याच्या आगामी सिनेमातून वगळल्यामुळे तो पाकिस्तानात सिनेमा प्रदर्शित करणार नाही असं म्हटलं जात आहे.
First Published: Feb 21, 2019 09:30 AM IST