बाॅक्स आॅफिसवर एका दिवशी चार मराठी सिनेमे रिलीज!

पहिलं म्हणजे आयपीएलचा हंगाम नुकताच संपलाय. दुसरं म्हणजे मुलांच्या मे महिन्यांच्या सुट्टीतला हा विकेण्ड असल्याने याच दिवशी सगळ्यांनी सिनेमा रिलीज करण्याचा हट्ट धरलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 31, 2018 05:13 PM IST

बाॅक्स आॅफिसवर एका दिवशी चार मराठी सिनेमे रिलीज!

विराज मुळे, मुंबई, 31 मे : दिवस एक, मराठी सिनेमे चार. बहुत नाईन्साफी है रे. असंच काहीसं आज म्हणावसं वाटतंय कारण आज तब्बल चार मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. एकाच दिवशी चार सिनेमे रिलीज करण्यामागे तशीच काही कारणंही आहेत. पहिलं म्हणजे आयपीएलचा हंगाम नुकताच संपलाय. दुसरं म्हणजे मुलांच्या मे महिन्यांच्या सुट्टीतला हा विकेण्ड असल्याने याच दिवशी सगळ्यांनी सिनेमा रिलीज करण्याचा हट्ट धरलाय.

यातला पहिला सिनेमा फर्जंद. शिवकालीन युद्धपट असलेला फर्जंद हा सिनेमा आज रिलीज झालाय. कोंडाजी फर्जंद यांच्या शौर्याची गाथा या सिनेमातून आपल्याला पहायला मिळणारे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, निखिल राऊत, अजय पुरकर, नेहा जोशी आणि अंकित मोहन अशी तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमाबद्दल हवा निर्माण झाल्यामुळे हा सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

याच दिवशी रिलीज होणार दुसरा सिनेमा आहे प्रियदर्शन जाधवचा मस्का. प्रियदर्शनचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. ज्यात अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रार्थना बेहेरे, शशांक शेंडे आणि प्रणव रावराणे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मुलीने प्रेमाचं अमिष दाखवून केलेल्या फसवणुकीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचं कथानक इंटरेस्टिंग असल्याने याही सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

याशिवाय बेधडक हा सिनेमाही आज रिलीज होतोय. संजय मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात एका बॉक्सरची गोष्ट दाखवण्यात आलीय. बॉक्सिंग हा खेळ तसा मराठी सिनेमात फारसा कधी दाखवण्यात आलेला नाही. सिनेमात नवोदित गिरीष टावरे, नम्रता गायकवाड, अशोक समर्थ, अनंत जोग यांच्या मुख्य भूमिका आहेत. खेळावर आधारित सिनेमे मराठीत फारसे यशस्वी ठरलेले नाहीत त्यामुळेच हा सिनेमा काय कमाल करतो याची उत्सुकता आहे.

गडबड झाली हा सिनेमाही आज रिलीज होतोय. या सिनेमात राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, विकास पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत. एकाच घरात रूप बदलून राहणाऱ्या मुलामुळे नक्की काय गडबड होते ते या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रिलीज होणारा राजेशचा हा पहिलाच सिनेमा आहे.

Loading...

थोडक्यात काय तर हे चारही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत असल्याने सगळ्या सिनेमांची थिएटर्स विभागली जाणार हे सत्य आहे. त्यातल्या त्यात हिंदीत रिलीज होणाऱ्या वीरे दी वेडिंग आणि भावेश जोशी या दोन सिनेमांशी त्यांची स्पर्धा आहेच. आणि वीरे दी वेडिंगबद्दल बऱ्याच अपेक्षा आहेत.

अशात पुन्हा एकदा एकाच दिवशी चार सिनेमे रिलीज करून नक्की काय साधणार हा प्रश्न उरतोच आणि त्याचं उत्तर आजच्या घडीला तरी मराठी इंडस्ट्रीत कुणाकडेच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...