गेल्या वेळी चला हवा येऊ द्या शो चौथ्या नंबरवर होता. यावेळी मात्र तो पाचव्या नंबरवर पोचलाय. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेनं मुसंडी मारलीय. पुन्हा आदल्या आठवड्यात नाळ आणि सैराटमुळे 'हवा'चं प्रमोशन झालं होतं.
स्वराजरक्षक संभाजी मालिकेसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरला. शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. रायगड पुन्हा एकदा दु:खसागरात बुडाला. त्यातही अष्टप्रधान मंडळाचं सुरू झालेलं राजकारण, शंभू महाराजांना रायगडापासून दूर ठेवणं अशा बऱ्याच घडामोडी या आठवड्यात घडल्या. त्याचा फायदा मालिकेला झाला.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं तोच नंबर कायम ठेवलाय. म्हणजे तिसरा नंबर. या वेळी तर राणादा आणि पाठकबाई यांच्यातला दुरावा जास्तच लांबलाय. अर्थात, रविवारी या मालिकेचा महाएपिसोडही झाला. पण त्याचे रिझल्ट पुढच्या आठवड्यात कळतील. एकूण काय, मालिकच्या प्रेक्षकवर्गानं साथ सोडली नाही.
दरवेळेप्रमाणे टीआरपी रेटिंगमध्ये झी मराठीच पहिल्या पाचमध्ये आहे. एकही वाहिनी तिथपर्यंत पोचत नाही. स्टार प्रवाहनं मालिकांचे महाएपिसोड्स ठेवले होते. त्याचाही परिणाम झाला नाही.
तुला पाहते रे मालिका याही वेळी दुसऱ्या स्थानावरच आहे. खरं तर आता या मालिकेत एखाद्या सिनेमाप्रमाणे घडामोडी घडतायत. विक्रांत-ईशाचं एकमेकांशी जिव्हाळ्यानं वागणं, ईशा तर प्रेम व्यक्त करतेच, पण विक्रांतही आता आपल्या वागण्यातून ईशाच्या जवळ जायला लागलाय. पुन्हा विक्रांतचा शत्रूही समोर उभा राहिलाय. प्रत्येक भाग हा रंजकच होतोय. पण तरीही अतिफिल्मीपणा मालिकेसाठी धोकादायक ठरू शकतो.
'माझ्या नवऱ्याची बायको' नेहमीप्रमाणे नंबर वनवर आहे. राधिका आणि शनायाची एकजूट गुरूला कळली. गुरू आणि राधिकामध्ये प्रचंड तणाव सुरू झालाय. त्यात राधिकाचे सहकारी, शेजारी यांना राधिकानं सौमित्रशी लग्न करावं असं वाटतंय. त्यातून नवा गुंता होतोय का ते कळेलच. त्यात आता शनायाच्या आईचीही एंट्री झालीय.