'नकळत सारे घडले'मधली नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरच्या मते परंपरेसोबतच आधुनिक विचारांची कास धरणंही महत्त्वाचं आहे. गगनभरारीचं स्वप्न पाहण्याचा आणि ते सत्यात उतरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. मालिकेत नेहाच्या रूपात आदर्श आई, आदर्श सून, आदर्श पत्नी ते यशस्वी डॉक्टर या भूमिकेत वावरायला मिळत असल्याचा विशेष आनंद नेहाला वाटतो.
'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रता प्रधानने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देत, महिलांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे हा मुद्दा अधोरेखित केलाय. संसाराचा गाडा सांभाळताना मुलांचं संगोपन करणारी, नोकरी करून घराला आधार देणारी 'ती' ही कर्ती स्त्रीच असते असं मधुराला वाटतं. या कर्त्या स्त्रीचा सन्मान हा व्हायलाच हवा असं मत नम्रताने व्यक्त केलंय. 'छत्रीवाली' मालिकेमधून मधुराच्या रूपात हीच कर्ती स्त्री साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंदही नम्रताने या निमित्ताने व्यक्त केलाय.
'ललित २०५' मधील भैरवी म्हणजेच अमृता पवारच्या मते स्त्री हे आदिशक्तीचं रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती होती, आहे आणि राहणारच. त्यामुळेच तर कितीही दु:खाचे कसोटीचे प्रसंग आले तरी ती त्याचा सामना खंबीरपणे करू शकते. हाच खंबीरपणा भैरवीमध्ये आहे. आपल्यातल्या खऱ्या शक्तीचा शोध घेतला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही असं अमृता पवारला वाटतं.
'छोटी मालकीण' मालिकेतील रेवतीने संसारासोबतच शिक्षणाचा ध्यासही घेतलाय. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात असं तिला वाटतं. इच्छेपुढे आभाळही ठेंगणं असतं. स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच तर लग्नानंतरदेखील रेवती म्हणजेच 'छोटी मालकीण' आपलं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.