विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गेल्या काही महिन्यांपासून मांसाहार पूर्णपणे बंद केलाय. ते केवळ व्हेजिटेरियनच नाही तर व्हिगन बनले आहेत.
व्हिगन डाएटमध्ये फक्त वनस्पतीजन्य पदार्थ खाणं अपेक्षित असतं. विराटनंसुद्धा प्राणीजन्य पदार्थ आहारातून पूर्णपणे बाद केले आहेत. आपण या डाएटमुळे आणखी मजबूत झाल्याचं विराट सांगतो.
कंगना रानौट : ही बॉलिवूड क्वीनसुद्धा शाकाहाराचा पुरस्कार करते. मी व्हिगन डाएटला सुरुवात केली आणि आयुष्यात खूप फरक अनुभवला. मी आता खूप आनंदी आहे, असं कंगनाने पिटा या संस्थेला सांगितलं. नॉनव्हेज सोडलं तेव्हा मी मोठ्या प्रमाणावर डेअरी प्रॉडक्ट्स घ्यायचे. दूध, दही, चीज यावर ताव मारायचे. पण या पदार्थांमुळे मला अॅसिडिटी होतेय, हे लक्षात आलं आणि मी व्हिगन डाएट स्वीकारलं. दुग्धजन्य पदार्थही बंद केले. त्यामुळे खूप फरक पडला, असं ती सांगते. कंगनाच्या मते, व्हिगन डाएट हे भारतीय संस्कृतीत खोलवर रुतलेल्या मूल्यांना समांतर आहे.
सोनम कपूर आहुजा : व्हेजिटेरिअन खाल्ल्यानंतर आतूनच खूप बरं वाटतं, असं सोनम सांगते. पाच- सहा वर्षांपूर्वी आपण मांसाहार सोडला. पण पूर्णपणे प्राणीज पदार्थ वर्ज्य करून व्हिगन डाएटला सुरुवात मात्र तिने अगदी काही काळापूर्वी केली आहे.
मल्लिका शेरावत : 'मर्डर'नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री आता व्हिगन झाली आहे. मी अगदी पूर्णपणे विचारपूर्वक मांसाहार सोडला आणि शाकाहाराला आपलंसं केलं, असं मल्लिका सांगते. शाकाहार मला भावतो. म्हणूनच मी आणखी खोल शिरत व्हिगन झालेय, असं ती सांगते.
रिचा चढ्ढा : मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री तिच्या वेगळ्या भूमिकांमुळे रसिकांच्या लक्षात राहिली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर आणि मसानमुळे तिने समीक्षकांचीही वाहवा मिळवली. तिने आपल्या डाएटमधून दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद केले आहेत. ती व्हिगन आहे. शिवाय ग्लुटेन फ्री आहार घेते. म्हणजेच ती गहू आणि मैदा असलेले पदार्थसुद्धा खात नाही. "मी व्हेजिटेरिअन होतेच, पण आता व्हिगन झालेय. भरपूर हिरव्या भाज्या आणि फळं मी आहारात घेते आणि माझ्या शरीराला ते उपयुक्त ठरलेत. मला खूप ताजं-तवानं वाटतं यामुळे", असं ती सांगते.
नेहा धुपिया : स्वतः नेहा ही पीटा या प्राणीहक्क संघटनेशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे पीटाच्या व्हिगन मोहिमेतही ती पहिल्यापासून सामील आहे. "व्हेज डाएटमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. चांगल्या आयुष्यासाठी शाकाहार हा एकमेव मार्ग आहे. त्यातून सगळ्या आरोग्य समस्या सुटतील", असं नेहा सांगते.