जिममध्ये जाऊन वजन कमी करणं हा तर आजकालच्या लोकांचा नवीन मंत्रा झाला आहे. तिथे जाऊन वजन कमी करणं किंवा वाढवणं आणि बॉडी बनवणं हा प्रकार सुरूच असतो. काहींना जिमला जाणं फारसं आवडत नाही. त्यामुळे ते घरीच योग करण्याला पसंती देतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, इतर उपयुक्त व्यायाम करूनदेखील तुम्ही वजन कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे पाच प्रकार सांगणार आहोत जे केल्याने तुमचं वजन कमी होऊ शकतं.
डान्स एक्सरसाईज – आता तुम्ही म्हणाल की, डान्स केल्याने कधी कुणाचं वजन कमी झालं आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. तुम्हाला जिममध्ये वर्कआउट करून कंटाळ येत असेल तर तुमच्यासाठी डान्स हा उत्तम पर्याय आहे. गाणी ऐकत डान्स करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. डान्स केल्यामुळे तुम्ही मोठ्याप्रमाणात कॅलरीज बर्न करतात. तसेच डान्स केल्याने तुमचा ताणही कमी होईल.
दोरी वरच्या उड्या – लहानणी बऱ्याच मुलींनी दोरी वरच्या उड्या मारल्या असतील. तेव्हा तो एक खेळ होता. लहानणी कुठे कुणाला माहिती असायचं की हा एक व्यायामाचा प्रकार आहे. तेव्हा तर सगळेच याकडे फक्त एक खेळ म्हणून पाहायचे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसातून एक तास दोरी वरच्या उड्या मारा. असे केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.
जिना चढणं – जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करावा. रोज जिना चढल्याने जवळपास ८५० कॅलरीज बर्न होतात.
सायकलिंग– सायकलिंग केल्यामुळे तुमच्या गुढग्यांचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर रोज एक तास जॉगिंग करण्यापेक्षा रोज अर्धा तास सायकलिंग केल्याने तुमचं शरीर सुदृढ राहतं. शरीरातील कॅलरीजदेखील बर्न होतात, आणि वेळही वाचतो.
पोहणे – दररोज स्विमिंग केल्यानेदेखील शरीरातील कॅलरीज बर्न होतात. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. ज्या लोकांना पोहायला आवडते त्यांनी वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. एक तास पोहल्याने तुम्ही जवळपास ५८५ कॅलरीज बर्न करू शकता.