विहिरीत 8 फुटी धामण..आणि कठड्यावर आत्महत्येच्या तयारीत होता तरुण; गावकरी मदतीसाठी आले पण...

विहिरीत 8 फुटी धामण..आणि कठड्यावर आत्महत्येच्या तयारीत होता तरुण; गावकरी मदतीसाठी आले पण...

औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात लोकांच्या डोळ्यांसमोर झालेल्या या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 10 जानेवारी: औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षत्रवाडी येथे एका तरुणाच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली असता, त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या गावकऱ्यांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना सुमारे दोन ते अडीच तास विहिरीच्या कठड्यावरचं बसून राहावं लागलं आहे. मदतीसाठी इतकी लोकं उपलब्ध असतानाही त्या तरुणाचा जीव वाचवता आला नाही. कारण तरुणाने उडी घेतलेल्या विहिरीत एक आठ फुट लांब धामण होती. या धामणच्या भीतीने मदतीसाठी धावून आलेल्या लोकांनी धोका पत्करला नाही. त्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

किशोर संजय महानोर असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 18 वर्षांचा होता. शेतीच्या वादातून झालेल्या घरगुती भांडणानंतर रागाच्या भरात या तरुणाने आत्महत्या केल्याचं समजत आहे. किशोर हा अविवाहित असून तो मोठा भाऊ आणि वडिलांसोबत शेती व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी काही कारणावरून त्याचं घरच्यांसोबत खटकलं. त्यानंतर रागाच्या भरात किशोरनं आपल्या शेतातील विहिरीत जीव देण्यासाठी उडी घेतली.

आपल्या मुलाला आत्महत्या करताना किशोरच्या वडिलांनी पाहिलं होतं, त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करुन लोकांना मदतीसाठी बोलावलं. गावकरीही मदतीसाठी धावून आले. परंतु विहिरीत आठ फुटांची सळसळती धामण पाहाता कोणीही त्या तरुणाला वाचवण्याचं धाडस करू शकलं नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी अग्निशमन दलाला संबंधित घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनीही विहिरीत उतरण्यास नकार दिला. त्यानंतर मनोज गायकवाड आणि सूरज साळवे या दोन सर्प मित्रांनी अथक प्रयत्नानंतर या धामणला पकडून विहिरीतून बाहेर काढलं.

त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने किशोरला विहिरीतून बाहेर काढलं. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. या तरुणाला विहिरीतून बाहेर काढायला तब्बल चार तास लागले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तत्पूर्वी डॉक्टरांनी किशोरला मृत घोषित केलं असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 10, 2021, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading