तिरुवअनंतपुरम, 7 जुलै : केरळच्या (Kerala) कोल्लम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कल्लूवथुक्कल गावातील एक महिला फेसबूकवरील प्रियकरासाठी (facebook) आपल्या नवजात बाळाला सोडून निघून गेली. या संपूर्ण घटनेत या महिलेच्या दोन नातेवाईकांचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या महिलेचं नाव रेश्मा आहे.
झालं असं की, एका रबराच्या शेतात एक नवजात बाळ पोलिसांना मरनासन्न अवस्थेत सापडले. या प्रकरणाचा तपास करत असताना या भागातील एक महिला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर कळलं की, रेश्माच्या कथित फेसबुक प्रियकराचं अकाउंट तिच्या नात्यातील दोन मुली चालवत होत्या. दोघीही प्रियकर पुरुष असल्याचं भासवून मेसेजवर रेश्माशी गप्पा मारायच्या. या दोघींनी प्रँक (चेष्टा) करण्यासाठी हे कृत्य केलं मात्र, त्याचा परिणाम वेगळाच झाला. त्यानंतर पोलीस पकडतील या भीतीने या दोन्ही तरुणींनी आत्महत्या केली.
पोलिसांनी 24 वर्षीय रेश्माला तिच्या बाळाची हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तिच्यावर कल्लूवथुक्कल गावातील शेतात बाळाला सोडून जाण्याचा आणि बाळाची हत्या केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. बाळाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बाळाची ओळख पटवण्यासाठी या परिसरातील काही महिलांचे डीएनए सँपल घेतले होते. त्यानंतर 22 जूनला त्यांनी रेश्माला अटक केली. रेश्माने पोलिसांना सांगितलं की तिच्या प्रियकराने तिला बाळासह स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे तिने बाळाला सोडून दिलं.
हे ही वाचा-बॅचलर्स पार्टीमध्ये मित्राचा The End; dead body रुग्णालयात टाकून काढला पळ
एसीपी वाय. निजामुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्माचा पती विष्णू 4 महिन्यांपूर्वी आखाती देशात काम करण्यासाठी निघून गेला. त्यानंतर रेश्माची फेसबूकवर अनाडू नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, महत्वाचं म्हणजे रेश्मा या तरुणाला कधीही भेटली नव्हती. या दरम्यान रेश्मा गर्भवती होती पण तिने याबद्दल घरात कुणालाच सांगितलं नाही. रेश्मा तिची नात्यातील बहीण आर्याचं सिम कार्ड वापरत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. पोलिसांनी रेश्माला अटक केल्यानंतर आर्याला समन्स पाठवलं. पोलिसांना संशय होता की याच सिम कार्डचा वापर फेसबूक फ्रेंडसोबत संपर्क करण्यासाठी झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्या आणि रेश्माच्या भावाची मुलगी ग्रीष्मा बेपत्ता झाल्या. दोघींचेही मृतदेह त्यांच्या घराजवळच्या एका नदीत आढळले. ग्रीष्मा आणि आर्या दोघीही चांगल्या मैत्रिणी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एसीपी निजामुद्दीन यांनी सांगितलं की, 'ग्रीष्माच्या प्रियकराकडून आम्हाला या घटनेतील महत्वाची माहिती मिळाली. ग्रीष्माचा प्रियकर रेश्मासोबत प्रँक करत होता. मात्र, रेश्मा त्याच्या सोबत पळून जायला तयार झाल्याने गोष्ट हातातून निघून गेली. पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर आर्याने हे संपूर्ण प्रकरण तिच्या सासूला सांगितलं. मात्र, तिची सासू कामावर गेल्यानंतर तिने ग्रीष्मासोबत नदीत उडी घेत आयुष्य संपवलं.' एका प्रँकमुळे एका घरातील तिघांचा जीव गेला. तर रेश्मा पोलिसांच्या अटकेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Facebook