पानीपत, 8 नोव्हेंबर : विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या किंवा पत्नीची हत्या यासंबंधीच्या घटना समोर येत असतात. यानंतर आता आणखी एक धक्कादयक बातमी समोर आली आहे. पतीला अडकवण्यासाठी महिलेने तिच्याच लिव्ह इन पार्टनरच्या घरी लाखोंची चोरी केली. दिल्लीच्या बुरारी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी स्वत:हून दखल घेत एफआयआर नोंदवला.
29 नोव्हेंबर रोजी बुरारीच्या वीरेंद्र नगर येथील एका घरात घरफोडी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता नीरज गुप्ता (नाव बदलले आहे) याच्या घरातून 25 लाखांचे दागिने आणि 10 लाखांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. घरी नीरजसोबत त्याची लिव्ह-इन पार्टनर रश्मी (नाव बदलले आहे) राहते. चौकशीत रश्मीने पतीवर चोरीचा संशय व्यक्त केला आणि पैसे न दिल्याने चोरी करण्याची धमकी दिल्याचे सांगितले.
रश्मीने सांगितले की घरातून डीव्हीआर गायब आहे. मात्र, एसएचओ राजेंद्र प्रसाद आणि एसआय सत्येंद्र सिंह यांच्या टीमने तपासादरम्यान डस्टबिनमधून डीव्हीआर जप्त केला. डीव्हीआरमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग काढले असता, रश्मीनेच घरातील सामान विखुरल्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तारा कापल्याचे दिसून आले.
रश्मीचा सहभाग समोर आल्यावर नीरज तक्रार देण्यास नकार दिली. त्यावर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत एफआयआर नोंदवला. तसेच महिलेवर कायदेशीर कारवाई सुरू केली.
हेही वाचा - क्रूरतेचा कळस! 12 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून केलं संतापजनक कृत्य
पतीला फसवण्यासाठी रचला कट -
रश्मीचा विवाह पानिपत येथील रहिवासी रमेशसोबत झाला होता. 2017 मध्ये रश्मीची नीरजशी भेट झाली. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, रमेशने रश्मी आणि नीरजचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही बनवले. 2019 मध्ये रश्मीने पतीला सोडले आणि नीरजसोबत राहू लागली. पोलिसांच्या चौकशीत रश्मीने सांगितले की, तिने पतीला अडकवण्यासाठी चोरीची कहाणी रचली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.