भोपाळ, 29 नोव्हेंबर : पत्नीकडून झालेल्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका युवकाने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 फूट उंच पूलावरुन उडी मारुन त्याने आपलं आयुष्य संपवलं. तीन दिवसांनंतर या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात उघडकीस आली. तरुणाने नर्मदा नदीवर असलेल्या पूलावरुन उडी मारली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह मुरल्ला गावाजवळ नर्मदा नदीत आढळला. पोलिसांना तरुणाकडे सुसाइट नोट सापडली आहे. मृत्यूपूर्वी त्याने स्वत:चा एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तरुणाने पत्नीवर घटस्फोटासाठी एक कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय त्याने पत्नीसह सासरकडील तीन जणांवर पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मृत तरुणाच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो काही दिवसांमध्ये नव्या नोकरीवर रुजू होणार होता. त्याआधी सर्व मित्रांनी ओंकारेश्वर फिरण्याचा प्लॅन केला होता. परंतु नोकरीवर जाण्यापूर्वीच त्याने टोकाचं पाऊल उचललं. मृत तरुणांच्या वडिलांनी त्याच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पैशांसाठीच छळ केला जात असल्याने मुलाने आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मृत तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला जात असताना एका पुलावर त्याने फोटो काढण्याचं कारण देत गाडी मध्येच थांबवली आणि त्याचवेळी त्याने नर्मदा नदीत उडी घेतली. पोलिसांना त्यांच्या बाइकच्या डिक्कीमध्ये सुसाइट नोट मिळाली. यात त्याने आपल्या मृत्यूसाठी सासरकडील तिघांना जबाबदार ठरवलं आहे. मागील तीन वर्षांपासून कुटुंबियांवर केस करुन एक कोटींची मागणी केल्याचंही नोटमध्ये म्हटलं आहे. या परिस्थितीला कंटाळून हे पाऊल उचलत असून दोषींना शिक्षा व्हावी असं तरुणाने नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Suicide news