कल्याण, 12 डिसेंबर : कल्याणमध्ये चैन स्नॅचिंगची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 75 वर्षीय आजीच्या गळ्य़ातून चैन हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेत आजीबाई चोरट्यांमुळे रस्त्यावर पडली. तिच्या पायाला आणि गळ्याला दुखापत झाली आहे.
कल्याण पूर्वेकडील श्रीकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय आजी चंद्रप्रभा पिळणकर या आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. कचरा टाकून घरी परत येत असताना दोन बाईकस्वार चोरटे आजीबाईंच्या दिशेने आले. चोरट्यांनी आजीबाईच्या गळ्य़ातील पावणे दोन तोळ्य़ाची चैन हिसकावून पळ काढला.
चोरटय़ांनी जोरदार हिसका दिल्याने आजी भर रस्त्यात खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या गळ्याला आणि पायाला दुखापत झाली. काही जणांनी ही घटना पाहून चोरटय़ांच्या पाठलाग केला. मात्र चोरटय़ांनी धूम ठोकली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.