जालना, 28 नोव्हेंबर : जालन्यातील (Jalana MIDC) औद्योगिक वसाहतीतील असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन (ATM) चोरट्यांनी स्कोर्पिओ गाडीतून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एटीएममधील 28 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या खळबळजनक घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा-पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना-औरंगाबाद महामार्गावरील नागेवाडी इथं पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे डायबोल्ड कंपनीचे एटीएम मशीन आहे. भल्या पहाटे चोरट्यांनी 2 वाजेच्या सुमारास हे एटीएम मशीन लंपास केले आहे. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण ओळखू येऊ नये म्हणून तोंडाला मास्क बांधले होते. तसंच आपली हालचाल दिसू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर वाढदिवसाचा स्प्रे मारला होता.
सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख 28 लाख 67 हजार 600 रुपये होते. या रक्कमेसह 4 लाखाचे मशीन असा 32 लाख 67 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी तक्रार दिली असून, चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.