नागपूर, 29 ऑक्टोबर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur )शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरातील नरेंद्रनगर, मानिषनगर आणि वर्धारोडवर (Wardha Road) वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे.
आज पहाटे चारच्या सुमारास नरेंद्रनगर, मानिषनगर आणि वर्धारोडवर ही घटना घडली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 ते 20 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहे. तर एका कारला पेटवून देण्यात आले आहे. या घटनेमुळे भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन तरुण एका दुचाकीवरून आल्याचे दिसून आले आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या दोन तरुणांपैकी एकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर पेट्रोल ओतले. त्यानंतर कारला पेटवून दिले. कारला आग लागल्यानंतर दोघेही जण दुचाकीवरून पळून गेले. विशेष म्हणजे, ज्या दुचाकीवरून हे तरुण आले होते, त्या दुचाकीची नंबर प्लेटही काढून ठेवण्यात आली होती.
पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. 20 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या पाचपावली भागामध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती. सतीश ठाकूर यांनी नेहमीप्रमाणे आपली फॉर्च्युनर कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधारात दोन अज्ञात तरुण हे दुचाकीवरून आले. दोघेही जण गाडीच्या बाजूला उभे राहिले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने गाडीच्या पेट्रोल ओतले पेटवून दिले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.