विजय देसाई, प्रतिनिधी
वसई, 1 फेब्रुवारी : वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाच्या खुनाचा तपास करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये पत्नीनच आपल कुंकू पुसण्यासाठी शेजाऱ्यांना एक लाखाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी मृताची पत्नी आणि शेजारी पतीपत्नीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
वसईच्या नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका पत्नीने आपल्याच पतीची हत्या करण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असं मयत पतीचे नाव असून अशिया अन्सारी असं आरोपी पत्नीचे नाव आहे. गोरेगाव पूर्वेच्या भगत सिंग चाळीत हे दामपत्य राहत होते.
वाचा -मृतदेह फेकायला आलेलाही त्याच्यासोबत पडला दरीत; आंबोलीतील प्रकरणाला वेगळं वळण
पत्नी अशिया हिने तिच्या शेजारी राहणारे दाम्पत्य बिलाल पठाण व सौफिया पठाण यांना कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार वसई जवळील नायगाव परिसरात त्याला नेवून दोघांनी धारदार शस्त्राने हत्या केली व झाडी झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर कमरुद्दीनची पत्नी अशिया हिनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार बांगूरनगर पोलीस ठाण्यात दिली. 27 जानेवारीला वालीव पोलिसांना हा मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर होते.
अनैतिक प्रेम संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारिंचा शोध घेतला व मृतदेहाची ओळख पटवून त्याचे राहते घर गाठले. परिसरातील नागरिकांकडून केलेल्या चौकशीत मयत कमरुद्दीनच्या घराच्या शेजारी राहणारे पती-पत्नी गुन्हा घडल्यापासून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे बेपत्ता झालेल्या पती-पत्नीला गुजरात वापी परिसरातून ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीत त्यांनी कमरुद्दीनच्या हत्येची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा 2चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.