मथुरा, 28 ऑक्टोबर : वडिलांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार, मग त्यांचा गळा दाबला, मृतदेह जाळून टाकला, पुरावे नष्ट केलं आणि मग बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. एखादी क्राइम फिल्म किंवा क्राइम सीरिअलमधील ही घटना वाटेल. मात्र ही प्रत्यक्ष घटना आहे. युट्युबर क्राइम व्हिडीओ पाहून लेकानंच आपल्या वडिलांविरोधात डाव रचला. त्यांची हत्या केली. यामध्ये त्याच्या आईनंही त्याची साथ दिली. या प्रकरणी मायलेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मथुरामधील (Mathura) ही घटना. आपल्या रागिष्ट वडिलांचा अल्पवयीन मुलानंच काटा काढला आहे. मनोज मिश्रा असं मृताचं नाव आहे. त्यांचा मुलगा किशोर आणि पत्नी संगीताने त्यांची हत्या केली आणि सर्व पुरावे नष्ट करून ते गायब झाल्याची तक्रार नोंदवली. वृंदावन पोलिसांनी जवळपास पाच महिने तपास केला. अखेर या हत्येचा उलगडा झाला.
2 मे 2020 रोजी मनोज मिश्रांनी आपला मुलगा किशोरला काठीनं मारहाण केली आणि मुलीलाही मारू लागले. तेव्हा किशोरला राग आला आणि त्याने लोखंडी रॉड आपल्या हातात घेऊन थेट वडिलांच्या डोक्यावर मारला. मनोज मिश्रा जमिनीवर कोसळले. त्यानंतर किशोरनं त्यांच्या तोंडावर कपडा टाकला आणि आपल्या दोन्ही हातांनी त्यांचा गळा दाबला. त्याच्या आईनेदेखील त्याची साथ दिली. मायलेकानं मनोज यांचा मृतदेह छतावर लपवून ठेवला.
मध्यरात्री दोन-तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी मृतदेह एका गोणीत भरला, आपल्या स्कूटीवर बांधला आणि वैष्णो धाम येथील एका ओसाड ठिकाणी नेला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिथं अॅसिड आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. ही आत्महत्या असल्याचं दर्शवण्यासाठी त्यांनी चष्मा, चप्पल, गळ्यातील माळ, बॅग जळत्या मृतदेहावरच फेकली. फिंगरप्रिंट मिळून नयेत म्हणून रक्ताने माखलेला रॉड रुक्मणी बिहार मार्गावरील एका रिकाम्या जागेत फिकून दिला. तर हत्या करताना वापरलेली घरातील अॅसिडची बाटली, मृतदेह बांधून नेलेली गोणी आणि ज्या कापडाने गळा आवळला ते कापडही जाळून टाकलं. हे सर्व सामान घरातील होतं त्यामुळे मृतदेहासोबत न जाळता ते दुसऱ्या ठिकाणी जाळलं.
हे वाचा - रस्त्यावर का थुंकतोस म्हणून विचारला जाब; रागात त्याने चाकूनंच भोसकलं
यानंतर 31 मे 2020 रोजी त्यांनी मनोज मिश्रा बेपत्ता झाल्याची तक्रार वृंदावन पोलीस ठाण्यात नोंदवली. लगेच तक्रार नोंदवली नाही जेणेकरून महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होण्यास वेळ जाईल.
तपासात पोलिसांना वैष्णो धामजवळ एक मृतदेह सापडला. किशोर आणि संगीतानं जसं मनोजचं वर्णन केलं होतं. तसंच साम्य या मृतदेहामध्ये होतं. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. किशोर आणि त्याच्या आईला मृतदेहाचा चष्मा आणि इतर सामान दाखवण्यात आलं. त्यांनी ते सामान मनोज यांचंच असल्याचं सांगितलं आणि हा मृतदेह मनोज मिश्रांचाच असल्याचं सिद्ध झालं.
किशोर आणि संगीता यांची अनेक वेळा चौकशी करण्यात आली. मात्र दोघांच्याही उत्तरात विरोधाभास होता. नेहमी वेगवेगळ्या गोष्टी समोर यायच्या. अखेर परिस्थितीजन्य पुरावे आणि चौकशीमध्ये सत्य समोर आलंच. दोघांनीही खरं काय आहे, ते सांगितलं.
हे वाचा - दुधाच्या तांब्यावरून सासू खेकसली म्हणून सूनेनं उचललं टोकाचं पाऊल...
एसपी उदय शंकर मिश्र यांनी सांगितलं की, तपासात मिळालेल्या माहितीनुसार मनोज मिश्रा खूप रागिष्ट स्वभावाचे होते. ज्यामुळे त्यांची पत्नी आणि त्यांची मुलंही त्यांच्यासमोर काही बोलू शकत नव्हते. नेहमी घरात भांडणं व्हायची. अल्पवयीन आरोपी युट्युबवर क्राइम सीरिअल किंवा क्राइम व्हिडीओ पाहायचा. त्यामुळे गुन्हा करण्याची आणि तो कसा लपवायचा याची त्याला चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्याने हत्या करून मृतदेह ठिकाणावर लावून सर्व पुरावे नष्ट केले.