शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) 6 मार्च : वयाच्या 12 व्या वर्षी बलात्कारानंतर (Rape) आई झालेल्या महिलेनं या प्रकरणाच्या 27 वर्षांनंतर दोन जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या महिलेनं तेव्हा लोकलज्जा आणि दबावामुळे तक्रार दाखल केली नव्हती. या महिलेनं बलात्कार आणि त्यामुळे झालेल्या मुलाची माहिती लपवली. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी तिचं लग्न झालं. आता मुलानंच तिला आपले वडील कोण आहेत? हा प्रश्न विचारल्यानंतर तिनं कोर्टात अर्ज करत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. आता कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या तपासामध्ये मदत व्हावी म्हणून पीडित महिलेनं स्वत:ची DNA टेस्ट करण्याचीही तयारी दाखवली आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपूरमधील हा प्रकार आहे. ही सर्व घटना 1994 साली घडली आहे. त्यावेळी पीडित महिला 12 वर्षांची होती. ती तिच्या बहिणीच्या घरी राहत असताना शेजारी राहणाऱ्या तरुणानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तरुणाच्या भावानंही तिच्यावर बलात्कार केला. या दोन्ही भावांनी पीडितेला धमकावून अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. पीडितेनं हे प्रकरण सुरुवातीला लपवलं. अखेर गर्भपात केल्यास धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितल्यानं तिनं वयाच्या 13 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. या मुलाची रवानगी पीडित महिलेनं तिच्या माहेरी केली.
नवऱ्याने दिला घटस्फोट
पीडित महिलेनं हे प्रकरण लपवून वयाच्या विसाव्या वर्षी लग्न केलं. लग्नानंतर तिला एक मुलगाही झाला. लग्नानंतर दहा वर्षांनी महिलेच्या नवऱ्याला पत्नीच्या भूतकाळाबद्दल माहिती झाली. त्यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला.
( वाचा : जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला बलात्कार प्रकरणातील आरोपी )
या दरम्यानच्या काळात त्या महिलेचा मुलगा मोठा झाला. त्याला आपल्या जन्माचं सत्य समजलं. त्यावेळी त्यानं आईकडे आपले वडील कोण आहेत? अशी विचारणा केली. मुलाच्या या प्रश्नानंतर महिलेनं तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात दोन आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Gang Rape, Uttar pardesh