मुरादाबाद, 16 जून : लग्नासाठी कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून भावी पतीनेच (young girl murder) तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेह रस्त्यावर फेकून फरार झाला. पोलिसांना रस्त्यावर मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मुलीच्या घरच्यांना याविषयी कळवलं असता त्यांनी तिच्या भावी पतीवर संशय व्यक्त करत त्यानेच तिला फोन करून बोलावून घेतल्याची माहिती दिली. धक्कादायक म्हणजे, त्याच्यासोबत आपल्या मुलीचा प्रेमविवाह होणार होता, असंही त्यांनी सांगितलं.
टीना असं मृत तरुणीचं नाव असून तिला तिचा भावी पती जितिन यानं लग्नाच्या कपडे खरेदीसाठी फोन करून बोलावून घेतलं होतं. या दोघांचं लग्न ठरलेलं असल्यानं घरच्यांनीही त्याच्यासोबत जाण्याची मुलीला परवानगी दिली. मात्र, टीनाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून तो पसार झाला. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरील लोकांकडून तो मृतदेह त्याच भागात राहणाऱ्या मदनलाल यांची मुलगी टीना हिचा असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत जितिन याला अटक केली. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशच्या मुराराबादमध्ये घडला आहे.
टीना आणि जितिन यांचं 20 जूनला लग्न होणार होतं. हा प्रेमविवाह असल्याची माहिती टीनाच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं. सर्वांनी या लग्नाला परवानगी दिली होती, अशीही माहिती त्यांनी दिली. मुलाला लग्न करायचं नव्हतं तर त्यानं नकार द्यायला हवा होता, असं म्हणत मुलीच्या घरच्यांनी आक्रोश केला. पाच दिवसांनंतर ज्या घरात आनंदोत्सव होणार होता, तिथं स्मशानशांतता पसरल्याचं चित्र आहे.
या प्रकरणी पोलिसांनी टीनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, तपासणीत टीना आणि गावातच राहणाऱ्या जितिन यांचे प्रेमसंबंध असल्याचं दोघांच्याही घरच्यांना समजलं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं हे लग्नही निश्चित झालं होतं. 14 जूनला जितिननं टीनाला कपडे खरेदीच्या बहाण्यानं फोन करून बोलावलं. टीनाला घरच्यांनी त्याच्यासोबत पाठवलं. दुपारी जितिन घरी परत आला. मात्र, टीना परतली नाही.
दरम्यान, घरातील सदस्यांना त्यांच्या मुलीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याची माहिती मिळाली. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटविली. जितिनने त्यांच्या मुलीची हत्या केली असल्याचा टीनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
हे वाचा - इथल्या जमिनीत म्हणे हिरे सापडतायत! श्रीमंतीच्या मोहापायी खोदायला धावले हजारो लोक…
मुरादाबादचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विद्या सागर मिश्रा म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितिन याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिस चौकशीत आरोपीनं जितिनला लग्न करायचं नसल्याचं सांगितलं आहे. कौटुंबिक सक्ती होती की इतर काही कारण होते, ही चर्चेचा विषय आहे, परंतु आरोपीने त्यानेच टीनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pradesh