लखनौ, 12 डिसेंबर : लग्नानंतर संसारात होणाऱ्या लहान-मोठ्या वादाचं रुपांतर भांडणात आणि भांडणाचं रुपांतर जीव घेण्याच्या घटनांमध्ये होण्याचं प्रमाण कमी नाही. नवरा-बायकोच्या भांडणात त्यांचे कुटुंबीय आणि विशेषत: लहान मुलं देखील भरडली जातात. बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यानं टोकाचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये त्या व्यक्तीसह त्याचं सर्व कुटुंब मृत्यूमुखी पडलं आहे.
उत्तर प्रदेशातून (U.P.) ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने बायकोसह तीन मुलांना ठार मारले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीवरुन (Suicide note) मिळाली असून त्यामध्ये बायकोच्या त्रासाला कंटाळून सर्वांची हत्या केली आणि आता आत्महत्या करत आहे, असे कारण त्या व्यक्तीने लिहून ठेवले होती.
काय आहे प्रकार?
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. घरातील भांडणाला कंटाळलेल्या एका 37 वर्षांच्या व्यक्तीनं त्याची पत्नी (वय 30 वर्ष) दोन मुलं ( वय 10 वर्ष आणि 8 वर्ष) तसेच एक मुलगी (वय 4 वर्ष) या सर्वांना प्रथम ठार मारलं. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
‘सर्व बाजूंनी तपास सुरु’
घरामधील वेगवेगळ्या भागात पत्नी आणि मुलांचे मृतदेह आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं. या सर्व मृतदेहांना आता पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलंय. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरुन या घटनेचं कारण समजलं असलं तरी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच या हत्याकांडाचं नेमकं कारण समजेल अशी पोलिसांना आशा आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ माजली आहे.