गाजियाबाद (उत्तर प्रदेश), 15 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाजियाबाद (Ghaziabad) पोलिसांनी एअरलाईन्स कंपनी, प्रसिद्ध बँक आणि हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देतो, असं सांगून बोगस कंपनी चालवणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये उच्चशिक्षित बहिण-भावांचाही समावेश आहे. ही टोळी गेल्या तीन वर्षांपासून लोकांची फसवणूक करत होती, अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
गाजियाबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रियंका, तिचा भाई निखिल आणि अनुप या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बोगस कंपनीमध्ये 13 जण कॉलर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून 20 मोबाईल, 200 पेक्षा जास्त जणांचे रिझ्युम, ट्रेनिंग लेटरसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या मंडळींनी आजवर सुमारे 1500 जणांची फसवणूक केली आहे.
या बोगस कंपनीचे प्रमुख प्रियंका आणि निखिल हे उच्चशिक्षित आहेत. प्रियंका ही LLB तर निखिल MBA आहे. निखिलला शिक्षणानंतर मोठ्या कंपनीत नोकरी मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यानं एक प्लेसमेंट कंपनीत नोकरी केली. तेथील अनुभवानंतर 2017 साली स्वत:ची कंपनी काढली. या कंपनीनं सुरुवातीला जॉब पोर्टलच्या माध्यमातून काही लोकांना नोकरी देखील मिळवून दिली. त्यावेळी ज्यांना नोकरी मिळालेली नाही, अशा लोकांचे पैसे परत केले नाही तरी चालंत हे निखिलच्या लक्षात आलं. त्यामधून त्यानं फसवणुकीचा धंदा सुरु केला.
काय होती कामाची पद्धत?
हे आरोपी ‘आपल्या कंपनीच्या माध्यमातून देशभरात नोकरी मिळवून देतो,’ असा दावा करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रोसेसिंग फी आणि बोगस ट्रेनिंग लेटर देऊन नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांकडून पैसे घेतले जात. मात्र ते कोणत्याही उमदेवाराकडून 10 हजार रुपयांपेक्षा कमीच पैसे घेत. कमी रकमेसाठी फसवणूक झालेले उमेदवार पोलिसांकडं जाणं टाळत याचा फायदा घेत गेल्या चार वर्षांपासून त्यांचा धंदा सुरु होता.
आरोपींनी कॉल सेंटरच्या माध्यमातून देशभर नेटवर्क तयार केलं होतं. उत्तर प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, पंजाब या राज्यातील बेरोजगारांचीही त्यांनी फसवणूक केली आहे.
दुसऱ्यांच्या बँक अकाऊंटवरुन कारभार!
या बोगस कंपनीचा दरमहा खर्च 2 लाख होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. उमेदवारांकडून ते पैसे जमा करण्यासाठी बँक अकाऊंट देखील भाड्यानं घेत असत. त्यासाठी दरमहा 20 ते 30 हजार रुपये भाडं संबंधित मंडळींना दिलं जात असे. आता पोलीस या टोळीनं कोणत्या व्यक्तींचं अकाऊंट भाड्यानं घेतलं होतं, याचा शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pradesh