भिवंडी, 31 ऑक्टोबर: एका अल्पवयीन मुलांशी संगमनत करून 20 वर्षीय तरुणाने साथीदाराच्या मदतीने शेजारच्या घरातील 2 लाख 86 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर (gold jewellery) डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दागिने चोरीचा गुन्हा दाखल होताच गुन्हे तपास पथकाने शिताफीने तपास करून चोरट्यांना 24 तासातच बेड्या ठोकल्या आहेत.
जयेश चंद्रकात पाटील (वय,20 रा. कोनगाव ) आणि नवीन उर्फ चिंट्या नरेंद्र रामबागी (वय,30 रा. चिकनघर, कल्याण ) असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहे. लॉकडाउन कालावधीत सर्वच व्यवसाय ठप्प असल्याने अनेक तरुण गुन्हेगारी मार्गाने पैसे मिळवून मौजमजा करीत असल्याचे विविध पोलीस ठाण्यात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत समोर आले आहे. अशीच घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील प्रेमनगर मधील चाळीत घडली आहे.
भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ
या चाळीत सुचित्रा संजय भोईर (वयं, 46) या कुटुंबासह राहतात. तर त्यांच्याच शेजारी आरोपी जयेश ही राहतो. 26 ऑक्टोबर रोजी एका अल्पवयीन मुलाशी संगनमत करून आरोपी जयेशने नवीन उर्फ चिंट्या याच्या मदतीने सुचित्रा यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले 2 लाख 86 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार सुचित्रा भोईर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल करताच साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पो.ना. किरण पाटील, पो.शी. कृष्णा महाले या पोलीस पथकाने तपास सुरू केला.
धक्कादायक! 'बाबा' म्हणत नाही म्हणून दीड वर्षांच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके
पोलिसांच्या तपासात शेजारी राहणारा तरुण व त्याचा मित्र रोज मौजमजा करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, शेजारी राहणाऱ्या जयेश आणि त्याचा मित्र नवीन उर्फ चिंट्या यांनी दागिने लंपास केल्याचे सांगितले.त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना 24 तासातच अटक करून चोरीला गेलेले 2 लाख 86 हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत करून आरोपींना पोलीस कोठडीत डांबले.