दिल्ली, 8 मार्च : होळीच्या दिवशी रंगांची उधळण करण्याऐवजी चाकू चालल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूच्या या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. दिल्लीमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. हा वाद दिल्लीच्या मुंडका भागात फ्रेंड्स एनक्लेवमध्ये झाला. दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रूमला दुपारी 1.36 वाजता, 1.42 वाजता आणि 1.47 वाजता फोन आला. सोनू नावाच्या मुलाचं भांडण बाजूच्या गल्लीत राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या अभिषेकसोबत झालं.
अभिषेक आणि त्याच्या मित्रांनी सोनूसोबत मारपीट केली. भांडण सोडवायला आलेल्यांनाही चाकूने मारलं गेलं, यानंतर अभिषेकलाही वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. या घटनेत एकूण 7 जण जखमी झाले. या सगळ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिकडे सोनू आणि नवीन नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अभिषेक आणि आणखी एक जण गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपासाला सुरूवात केली आहे. वाद झालेले मुंडका भागात एका नमकीन फॅक्ट्रीमध्ये मजूर म्हणून काम करतात. या हल्ल्याच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 7 जण जखमी झाले, ज्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे त्यांना दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर तीन जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.