नवी दिल्ली, 26 मार्च: मध्य प्रदेशातील भोपाळमधील दोन बँकांची (Fraud in Bank) फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) दोन कंपन्यांवर छापे मारले. बनावट दस्ताऐवजांच्या आधारे या दोन कंपन्यांनी बँकांकडून 200 कोटींचं कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर लगेचच खातं एनपीए झाल्याने फसवणूक झाल्याचं बँकांना लक्षात आलं. फसवणुकीप्रकरणी बँकांनी तात्काळ तक्रार दाखल केली. या तक्रारींची दखल घेतल सीबीआयने तपासाची सूत्र हाती घेतली.
ज्योति पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड या कंपनीने बनावट दस्तावेजच्या आधारे बँक ऑफ बडोदामधून (Bank of Baroda) 196 कोटींचं कर्ज घेतलं होतं. संचालक कमलेश आणि संजय नेमानी यांनी 196 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. तर दूसरीकडे सिद्ध पाल सिंह भदौरिया यांच्या कंपनीने प्रॉपर्टीचे बनावट दस्ताऐवज सादर करत इंडियन ओव्हरसीज बँकेची (Indian Overseas Bank) 4 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
(हे वाचा-LIC ग्राहकांसाठी खूशखबर! 6 महिन्यांसाठी नाही द्यावा लागणार गृहकर्जाचा EMI)
या दोन्ही प्रकरणात सीबीआयने अहमदाबादमधील 4 तर राजकोटमधील एका ठिकाणी छापा मारला आहे. तर सिद्ध सिंह यांच्या भोपाळ आणि निवाडीतील निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या प्रकरणात बँकेचे मॅनेजर सतीश चंद्र अग्रवालही सीबीआयच्या रडारवर आहेत.
देशातील 11 राज्यात सीबीआयची छापेमारी
देशात 30 हून अधिक बँकांची फसवणूक झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यात 3700 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे. सीबीआयने आतापर्यंत देशातील 11 राज्यातील 100 हून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत. आयओबी, यूबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, एसबीआय, आयडीबीआय, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या मोठ्या बँकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात सीबीआयने कानपूर, गाझियाबाद, मथुरा, नोएडा, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरु, त्रिपुरा, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, अहमदाबाद, सूरत या ठिकाणी छापे मारले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, CBI, Crime, Madhya pradesh, Money, Money fraud, Scam