मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दोन कोटींसाठी फेक मृत्यू, खोटे आई-वडील आणले, मुंबईच्या तरुणाचा भयानक कांड

दोन कोटींसाठी फेक मृत्यू, खोटे आई-वडील आणले, मुंबईच्या तरुणाचा भयानक कांड

इन्श्यूरन्सच्या पैशासाठी मृत्यूचा बनाव, खोटे आई-वडील

इन्श्यूरन्सच्या पैशासाठी मृत्यूचा बनाव, खोटे आई-वडील

विम्याच्या 2 कोटी रुपयांसाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. हे पैसे मिळवण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने स्वत:चे खोटे आई-वडीलही उभे केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 मार्च : विम्याच्या 2 कोटी रुपयांसाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. हे पैसे मिळवण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने स्वत:चे खोटे आई-वडीलही उभे केले. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या या तरुणाचं नाव दिनेश टाकसाळे असं नाव आहे. तर अनिल लटके आणि विजय माळवदे अशी त्याच्या साथीदारांची नावं आहेत.

21 एप्रिल 2015 मध्ये दिनेश टाकसाळेनं दोन कोटी रुपयांची पॉलिसी काढली. एक वर्षभर त्याचं प्रिमिअमही भरलं. 25 डिसेंबर 2016 रोजी पुणे नगर रस्त्यावर अपघाती निधन झाल्याचा बनाव करण्यात आला. यासाठी 2017 मध्ये पॉलिसी क्लेमचा दावा करण्यात आला. दावा करण्यासाठी आलेल्या दाम्पत्यानं ते दिनेश टाकसाळेचे आई-वडील असल्याचं सांगितलं. एलआयसीला या दाव्यावर संशय आला. त्यांनी स्वतंत्र चौकशी केली असता दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. शिवाय जे आई-वडील दावा करत होते तेही बोगस असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता त्या अपघातातला मृतदेह कुणाचा होता याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या खऱ्या आईने आपला मुलगा जिवंत असल्याचं सांगितलं.

मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. 21 फेब्रुवारीला एलआयसी अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी तक्रार केली, यानंतर पोलिसांनी 465, 467, 468, 479, 420, 120(B)आणि 511 ही कलमं लावून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असा होता घटनाक्रम

दिनेश टाकसाळेनं 21 एप्रिल 2015 साली 2 कोटी रुपयांची एलआयसी पॉलिसी घेतली, यानंतर एक वर्ष आरोपीने प्रिमिअमही भरला, यानंतर 14 मार्च 2017 ला दुसऱ्या आरोपींनी एलआयसीकडे इन्श्युरन्स क्लेमचा अर्ज दाखल केला. यामध्ये 25 डिसेंबर 2016 साली पुणे-नगर भागात बेलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्ते अपघातात दिनेशचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

अर्ज मिळाल्यानंतर एलआयसीने चौकशीला सुरूवात केली, यानंतर तब्बल 6 वर्षांनी एलआयसीला दिनेशचा मृत्यूच झाला नसून तो जिवंत असल्याचं समजलं. 2016 साली बेलवाडी पोलीस स्टेशनला जाऊन दिनेशची ओळख पटवणारे त्याचे आई-वडीलही खरे नसल्याचं पुढे तपासात समोर आलं. पॉलिसी विकत घेण्यासाठी दिनेशने जी कागदपत्र दिली, तीदेखील खोटी होती.

दिनेशने पॉलिसी विकत घेताना आपण शेती करत असून आपली कमाई 35 लाख रुपये असल्याची माहिती दिली. याचबरोबर आपण एक मेस चालवत असून वर्षभरात यातून 7-8 लाख रुपये कमावतो, अशी माहिती दिनेशने पॉलिसी विकत घेताना दिली.

एलआयसीने त्यांच्या तपासात दिनेशने दिलेली कागदपत्र बोगस असल्याचं सांगितलं पण पॉलिसी सुरू करताना याकडे लक्ष का देण्यात आलं नाही? यामुळे एलआयसीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेशच्या खऱ्या आईने तो जिवंत असल्याचं तसंच त्याच्या वडिलांचं 2012 साली निधन झाल्याचं एलआयसीला सांगितलं. आरोपींना पुणे-नगर रस्त्यावर एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालाय हे कसं कळालं? अपघातानंतर बेलवाडी पोलीस स्टेशनला जाणारे दिनेशचे खोटे आई-वडील कोण? या गोष्टींचा तपास करण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे.

First published:
top videos