बापरे! चोरीसाठी खोदला 20 फूट बोगदा, चारशे किलो चांदीवर डल्ला

बापरे! चोरीसाठी खोदला 20 फूट बोगदा, चारशे किलो चांदीवर डल्ला

चोरानं डॉक्टरच्या घराच्या मागच्या बाजूला 90 लाखात एक घर विकत घेतलं. यानंतर या घराच्या खोलीतून बोगदा करत चोरी केली.

  • Share this:

जयपूर 27 फेब्रुवारी : राजस्थानच्या जयपूरमधील वैशाली नगर ठाण्याच्या क्षेत्रात एका आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेचा खुलासा झाला आहे. शहरातील प्रसिद्ध हेअरप्लांट तज्ञ डॉ. सुनीत सोनी यांच्या घरात 20 फूट लांब बोगदा बनवून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. तळघरातील तीन बॉक्समध्ये लपवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या चांदीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरांनी या घटनेसाठी किती प्रयत्न केले याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो, की चोरांनी यासाठी डॉक्टरच्या घराच्या मागच्या बाजूला 90 लाखात एक घर विकत घेतलं. यानंतर या घराच्या खोलीतून बोगदा करत चोरी केली. घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा सोनी यांनी पाहिलं की बेसमेंटमधील चांदीचे बॉक्स गायब आहेत. यानंतर शुक्रवारी त्यांनी पोलिसांत याबद्दल तक्रार दिली.

पोलिसांनी अधिक तपास केला असता असं लक्षात आलं, की सोनी यांच्या घरामागील एका घराची फरशी काढून त्याद्वारे डॉक्टरच्या घरापर्यंत 20 फूटाचा बोगदा तयार करण्यात आला. डॉक्टरनं जवळपास तीन महिन्यांपूर्वी 3 बॉक्समध्ये चांदी भरुन हे बॉक्स घरामध्ये पुरुन ठेवले होते आणि यावर फरशी बसवण्यात आली होती. मात्र, चोरांना  याबद्दलची माहिती मिळाली होती. चोरांनी बेसमेंटपर्यंत पोहोचण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी शेजारीच एक घर विकत घेत बोगदा तयार केला.

चोर या बोगद्याद्वारे बेसमेंटपर्यंत पोहोचले आणि त्यांनी फरशी काढून तिन्ही बॉक्स लंपास केले. यानंतर पुन्हा फरशी अशाप्रकारे लावली की कोणालाही शंका येऊ नये. त्यांनी बोगद्याचं तोंडही बंद केलं होतं. त्यांच्या घरातून जवळपास 400 किलो चांदी चोरी झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सोनी यांनी पोलिसात केवळ दागिने गायब झाले असल्याची तक्रार दिली आहे, यात किती दागिने होते, याबद्दलचा काहीही उल्लेख नाही.

पोलीस आता चोरांचा शोध घेत आहेत. ज्या घरातून बोगदा बनवण्यात आला होता, ते घर 4 जानेवारीलाच एका व्यक्तीनं 90 लाखात विकत घेतलं होतं. त्यामुळे या चोरीसाठीच घर विकत घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या घटनेमध्ये 2 ते 3 लोकांचा समावेश असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेत डॉक्टरच्या जवळच्या लोकांचाही हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे, कारण घराच्या बेसमेंटमध्ये चांदी ठेवली आहे, ही गोष्ट चोरांना समजली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं असून लवकरच संपूर्ण प्रकरण समोर येईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 27, 2021, 9:12 AM IST

ताज्या बातम्या