हरियाणा, 10 डिसेंबर : तब्बल 11 वर्षांपर्यंत खोलीत कैद करीत दुष्कर्म केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने एका साधुवर हा आरोप केला आहे. या साधूने काही वर्षांपूर्वी या तरुणीचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिच्यासोबत दुष्कृत्य केलं. ही घटना हरियाणातील यमुनानगर येथील आहे. पीडिता 11 वर्षांनंतर कशीबशी साधुच्या तावडीतून सुटली व तिने पळ काढला. या पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. साधुच्या तावडीतून सुटल्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
इतक्या वर्षांनंतर मुलीला पाहून कुटुंबीयही हैराण झाले. 24 ऑगस्ट 2009 मध्ये तिच्या कुटुंबीयांनी आपली 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट दाखल केला होता. यानंतरही पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तिचा पत्ता लागला नाही. पोलीस ठाण्यात तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पीडितेने सांगितलं की, यशपाल नावाच्या एका साधुने 2009 मध्ये तिचं अपहरण केलं होतं. तरुणीने सांगितलं की ती बाजारात गेली असताना तिचं अपहरण करण्यात आलं आणि तिला एका खोलीत कैद करण्यात आलं. तरुणीचा आरोप आहे की, यशपाल तिला नशेचं औषध देत होता. बेशुद्धीत असताना अनेकदा यशपालने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने दोन मुलांना जन्म दिला. यशपालने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पीडितेने सांगितलं की यशपालने तिला मंदिराजवळील एका खोलीत नेलं आणि तेथे तिला ठेवण्यात आलं. येथे यशपालने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तिने आरोप केला आहे की यादरम्यान गावच्या सरपंचांनीही छेडछाड केली होती.