दिंडीगुल, 2 जानेवारी : तामिळनाडूतील (Tamilnadu) दिंडीगुलमधून अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचं दोन्ही मुलं देवं तिचा आत्मा परत पाठवले या आशेवर तिच्या मृतदेहाशेजारी (Mothers deadbody) बसून राहिली. यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
इंदिरा नावाची एक महिला दिंडीगुलमधील एका पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करीत होती. महिलेला मूत्रपिंडासंबंधित आजार होता. काही वर्षांपूर्वीच इंदिरा आपल्या मुलांना घेऊन वेगळी झाली होती. इंदिराला एक 13 वर्षाचा मुलगा आणि एक 9 वर्षाची मुलगी आहे. दोन्ही मुलांना इंदिरा एकटीच वाढवत होती.
मिळालेल्या माहितीनुसार इंदिराने काही काळापूर्वी मूत्रपिंडाच्या आजारामुळे पोलीस विभागाकडे ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी विनंती केली होती. काही दिवस इंदिरा पोलीस स्टेशनला जात नव्हती. त्यानंतर एक महिला कॉन्स्टेबल तिची माहिती घेण्यासाठी इंदिराच्या घरी पोहोचली. त्यावेळी तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला मोठा धक्का बसला. इंदिराची दोन्ही मुलं तिच्या मृतदेहाशेजारी बसून होती आणि घरातून दुर्गंध येत होता.
महिला कॉन्स्टेबलने मुलांना आईबाबत विचारलं तर ते म्हणाले की, आई झोपली आहे, तिला उठवायचं नाही. नाहीतर देव तिला त्रास देईल. महिला कॉन्स्टेबलला संशयास्पद वाटल्यानंतर तिने वरिष्ठांना याबाबत सांगितलं. जेव्हा पोलीस चौकशीसाठी आली तेव्हा कळालं की इंदिराचा मृत्यू झाला आहे. गेल्या 20 दिवसांंपूर्वीच इंदिराचा मृत्यू झाला होता. इंदिराच्या आसपास पूजा वगैरे साहित्य पडले होते. पोलिसांनी तपास केला असता मिळालेल्या माहितीनुसार 7 डिसेंबर रोजी इंदिरा बेशुद्ध झाली होती. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पण पुजारी सुदर्शनच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात नेण्यात आले नाही. पुजार्याने मुलांना आणि इंदिराच्या बहिणीला सांगितलं की, इंदिराला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, अन्यथा देव इंदिराचं रक्षण करणार नाही. त्यानंतर सुदर्शन देखील कुटुंबासमवेत घरातच राहिला. बाहेरून घर बंद केल्यानंतर तब्बल 20 दिवस तो इंदिराच्या आत्म्याला परत आणण्यासाठी पूजा करीत होता. इंदिराच्या मुलांनी पोलिसांना सांगितलं की कोणीही आईला त्रास देऊ नये, ती फक्त झोपली आहे. सध्या पोलिसांनी पुजारी सुदर्शन आणि इंदिराच्या बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.