सोनभद्र, 9 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सोनभद्र गावात एका लग्नसोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विवाहितेचा सकाळी तिच्या घराजवळ मृतदेह (Murder) सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी महिलेचे कपडे अस्तव्यस्त झाले होते. याशिवाय धक्कादायक म्हणजे महिलेच्या तोंडात आणि नाकात माती भरलेली होती. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यावर पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत दुष्कृत्य झाल्याची पुष्टी झालेली नाही. तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
ही घटना जुगैल पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात झाली. महिला आपल्या माहेरी तब्बल महिन्याभरापूर्वी आली होती. सोमवारी गावातील एका घरात लग्नाचा कार्यक्रम होता. महिला घरातील मंडळींसोबत तेथे गेली होती. रात्री उशिरा बाकी कुटुंबीय घरी परतले, मात्र महिला तेथेच थांबली. सकाळी जेव्हा ती परतली नाही त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय घराबाहेर पडले. घरापासून 300 मीटर अंतरावर तिचा मृतदेह पडला होता. तो पाहून कुटुंबीयांना जबर धक्का बसला. महिलेचा मृतदेहावर माती पसरली होती. तिच्या नाकात आणि तोंडात माती भरली होती. सोबतच गळ्यावर व्रण होते. कुटुंबीयांनी तिच्यासोबत दुष्कृत्य झाल्याची आशंका व्यक्त केली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
गळ्याभोवत खूणा, बलात्काराची पुष्टी नाही
पोलीस अधिक्षक अमरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालात महिलाच्या गुप्तांगावर कोणत्याही प्रकारची जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे महिलेसोबत बलात्कार झाल्याची पुष्टी झालेली नाही. तिच्या गळ्याभोवती व्रण आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर पुढील तपास करण्यात येणार आहे.