बदायू, 22 सप्टेंबर : गेल्या शनिवारी बदायूं (Badaun) जिल्हात मुलाच्या हव्यासापोटी एका नराधमाने आपल्या पत्नीच्या पोटातील बाळाचं लिंग पाहण्यासाठी पत्नीचं पोटच फाडल्याच्या धक्कादायक घटनेमुळे अख्खा देश हादरला आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.
आता या प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करीत महिलेची प्रसूती केली आणि महिलेने एका मृत मुलाला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी आणखी एक शस्त्रक्रिया करुन पोटाबाहेर आलेल्या आतड्यांना पोटात टाकलं आहे. महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाली आहे. गर्भात असलेला मुलगाच होता, ज्यासाठी नराधमाने आपल्या पत्नीचं पोट फाडलं. महिलेच्या भावाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडित महिलेचा भाऊ रवी यांनी सांगितलं की, महिलेला 5 बाटल्या रक्त चढविण्यात आलं आहे. पीडितेच्या भावाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, तो तुरुंगात आरामात जगत असेल, इथे माझी बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला ज्याची अपेक्षा होती तेच घडलं मात्र त्याच्या जन्म होताच मृत्यू झाला. माझ्या बहिणीचा पती पन्नालाल या बाळाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे.
आरोपीला आहेत 5 मुली
हे ही वाचा-बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं
अनिताला 5 मुली आहेत. ती सहाव्यांदा गर्भवती राहिली होती. दुसरीकडे मुलाच्या हव्यासापोटी तिच्या नराधम पतीने असं काही केलं की जे देशासाठी अत्यंत लज्जास्पद होतं. पत्नीच्या गर्भातील बाळाचं लिंग पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचं पोट फाडलं. रविवारी महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याचे पाहून तिला बरेली येथे हलविल्यात आलं. त्यानंतर तिला दिल्लीला रेफर करण्यात आलं. पीडितेच्या भावाने आरोपीविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पोलिसांनी तुरुंगात पाठवलं आहे.
देशातील एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी विविध योजना राबविणाऱ्या आपल्या देशात आजही असा प्रकार घडणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. उत्तर प्रदेशातील पाच मुलींच्या बापाने अत्यंत दृष्कृत्य केलं आहे. मुली या मुलांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, असं आपण म्हणत असतो तरी देशात आजही मुलगा हवाच असतो. याच विचारातून या 5 मुलींच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीसोबत अत्यंत हीन अशी वागणूक केली आहे.