छत्तीसगड, 24 जून : तेलंगणासह दंडकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरि भूषण या जहाल माओवाद्याचा आजारामुळे मृत्यू झाल्याच्या बातमीवर माओवाद्यांनी आज अधिकृत पत्रक काढून शिक्कामोर्तब केलं आहे. याशिवाय भारतक्का माओवादी नेत्याच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं असून हरिभूषणच्या मृत्यूने दहशतीचे एक पर्व संपुष्टात आलं आहे. माओवादी नेता हरिभूषणचं मूळ नाव यापा नारायणा असून तेलंगणाच्या महबुबाबाद जिल्ह्यात माडेगुडम येथील रहिवासी होता.
पीपल्स वॉर ग्रूप या माओवादी संघटनेपासून 1995 मध्ये माओवादी चळवळीत आपला प्रवास सुरू करणाऱ्या हरी भूषणवर माओवादी संघटनेच्या तेलंगणा राज्य समितीचा सचिव पदाची जबाबदारी होती. यासोबतच हरी भूषणकडे दंडकारण्यातील या तीन राज्याच्या सीमावर्ती भागाची जबाबदारी माओवादी नेतृत्वाने सोपवली होती. पंचवीस वर्षांपूर्वी पीपल्स वार ग्रुप या माओवादी संघटनेत प्रवेश करणाऱ्या हरी भूषणमध्ये संघटनात्मक बांधणीसह हिंसक घटनांची आखणी करण्याचा हातखंडा होता.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या उत्तर तेलंगणाच्या अनेक हिंसक घटनांचा सुत्रधार हरिभूषण होता. गेल्या काही वर्षात माओवादी चळवळीच मूळ असलेल्या तेलंगणात माओवादी चळवळीला हादरा बसल्याने हरिभूषणवर माओवादी नेतृत्वाने महत्वाची जबाबदारी सोपवली होती. सध्या हरिभूषण माओवादी संघटनेत तेलंगणाच्या राज्य सचिव पदाची जबाबदारी होती.
गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षे माओवादी चळवळीत अहेरी सिरोंचा तालुक्यात माओवादी चळवळीचे नेतृत्व करणा-या कमांडर श्रीनुच्या काळात हरिभूषणची गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सक्रियता वाढली होती. हरिभूषणने काही माओवाद्यांना या काळात महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमावर्ती जंगलात विशेष प्रशिक्षण दिल्याची बाब उघड झाली होती. सिरोंचा अहेरी तालुक्याला लागून तेलंगणाची सीमा असून प्राण होता. गोदावरी या दोन नद्यांच्या वाटे माओवादी नेते छत्तीसगडच्या अबुझमाडमध्ये प्रवेश करतात. सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणाची जी सीमा आहे. त्यात महादेवपुर कोटपल्ली चेन्नुर हा परिसर घनदाट जंगल असलेला भाग असून हरिभुषण अनेकदा या मार्गाचा वापर करण्यासह पोलिसांचा ससेमीरा चुकवण्यासाठी या भागात वास्तव्याला असायचा.
हे ही वाचा-कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू; तिसऱ्याची प्रकृती गंभीर
अनेक चकमकीत हरिभूषण सुरक्षित निसटला होता. अलीकडेच माओवादी नेतृत्वाने दंडकारण्यात माओवादी संघटना मजबूत करण्यासाठी हरिभूषणवर अतिरिक्त जबाबदारी दिली होती. सुकमा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण झालेल्या हरिभूषणला काल सकाळी ह्दयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची बातमी दंडकारण्यात पसरली होती. तेलंगणाच्या कोत्तागुडम येथील पोलीस अधीक्षक सुनीलदत्त यांनी सुत्रांकडून पोलिसांना मिळालेली माहिती असल्याचं बोलताना मान्य केले आहे. दरम्यान हरिभूषणच्या मृत्यूवर माओवादी चळवळीने अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याने हरिभूषणच्या मृत्यूच्या बातमीवर दंडकारण्यातल्या सुरक्षा यंत्रणेसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले होते. हरिभूषणवर दंडकारण्यातल्या सगळया राज्याचे मिळून एक कोटीचे बक्षीस असून 2018 मध्ये झालेल्या चकमकीत हरिभूषण ठार झाल्याची बातमी खोटी ठरली होती. मात्र दुसऱ्यांदा पोलीस सूत्र त्याच्या मृत्यूवर बोलत होते.
दरम्यान माओवाद्याच्या केंद्रीय समितीने आज एक पत्रक काढून माओवादी नेता हरिभूषणसह महिला माओवादी भारतअक्काचाही मृत्यू झाल्याचे मान्य केल्याने या मोठया माओवादी नेत्याच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले असून दहशतीचे एक पर्व संपुष्टात आले आहे. या माओवाद्यावर सुकमाच्या जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले असून दोन्ही माओवाद्याचे मृत्यूनंतरचे फोटोही माओवाद्यानी जारी केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news