पुणे, 25 फेब्रुवारी : पुण्यात शिकण्यासाठी आलेलं एक प्रेमीयुगुल अनैतिक संबंधातून एक अपत्य जन्माला घालतं. मात्र आपली बदनामी होईल या भीतीने ते अपत्य एका विवाहित जोडप्याला बेकायदेशीररित्या दत्तक देतं. मात्र, मुलीचा सांभाळ करणाऱ्या त्या विवाहित जोडप्याच्या घरातून तिचं अपहरण होते. अपहरणकर्त्यांना पोलीस पकडतात आणि तपास पुन्हा त्या प्रेमी युगलावर येऊन थांबतो.
एखाद्या सस्पेन्स चित्रपटाचं कथानकही एवढं रंजक नसेल अशी ही घटना प्रत्यक्षात पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. केवळ चार महिने वय असलेली गोंडस चिमुकली तिच्या आईच्या कुशीत असायला हवी ती अशी पोलिसांच्या मिठीत बागडतेय.
अर्थातच जन्मल्या नंतर केवळ चारच महिन्यात आपण थेट पोलिसांच्या कुशीत कसे आलो हे तिला कळणार नाहीच मात्र तिला इथंवर आणणारे हेच आरोपी आहेत. अपघाती गर्भपात झाल्याची बाब पती व घरच्यांपासून लपवून ठेऊन आपण मुलीला जन्म दिला. हे दाखविण्यासाठी बीडमधील रहिवासी असलेल्या या आरोपी राणी यादवने चिमुकलीच अपहरण केलं.
तेव्हा आपण चिमुकलीचे वडील असल्याचे सांगत राजेंद्र नागपुरे नामक व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली. तपासाची चक्रे फिरली, पोलिसांनी आरोपी राणीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून बाळाची सुखरूप सुटका केली.
मात्र, जेव्हा ते बाळ देण्यासाठी फिर्यादी नागपुरे दाम्पत्याकडे गेले तेव्हा पोलिसांना मुलगी आणि नागपुरे यांचा रंग बघून संशय आला. मग पोलिसांनी त्यांनाही पोलीस खाक्या दाखवला तेव्हा या बाळाचे जन्मदाते वेगळेच असल्याची बाबसमोर आली आणि या घटनेच बिंग फुटलं.
तेव्हा पोलिसांनी खऱ्या माता पित्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका प्रेमी युगुलाला त्यांच्या अनैतिक संबंधातून हे बाळ झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले. तपास पूर्ण झाल्याचं समाधान व्यक्त करत पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ह्या चिमुकलीची रवानगी शिशुविहारमध्ये केली जाणार आहे. मात्र, त्यानंतर हे प्रकरण संपलं असं मुळीच नाहीये, कारण या प्रकरणामागील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
एवढ्या गोंडस बाळाला जन्म देणारे ते प्रेमी युगुल कोण?त्यांनी बाळाला जन्म देताना ज्या दवाखान्यात उपचार घेतले आणि जिथे बाळाला जन्म दिला तिथे पती पत्नी असल्याचे पुरावे दिले होते का? कुठलीही कायदेशीर कारवाई न करता बाळ दत्तक देण्या घेण्याच कसं ठरलं? या मागे कोण आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kidnapping, Maharashtra, Parents and child, Pune