नवी दिल्ली, 16 डिसेंबर : फोन हा सध्याच्या काळात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. फोनसाठी काही जण आपला जीवही धोक्यात घालू शकतात. पूर्वी एकदा एका तरुणाने आयफोनसाठी आपली किडनी विकल्याचा प्रकार समोर आला होता. आता तरुणाच्याबाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपला फोन शोधण्यासाठी जीव धोक्यात घातला. फोन शोधण्याच्या नादात तो दोन मोठ्या खडकांमध्ये अडकला होता. सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलं आहे.
तेलंगणच्या कामारेड्डी जिल्ह्यात मोठ्या खडकांमध्ये अडकलेल्या एका तरुणाची सुटका करण्यात आली आहे. तेलंगण पोलिसांनी 15 डिसेंबरला सांगितलं, की घानपूर जंगलाजवळ गुहेत अडकलेल्या एका तरुणाची सुटका करण्यात आली आहे. राजू असं त्याचं नाव असून, तो रेड्डीपेट गावचा रहिवासी आहे. या संदर्भातलं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
कामारेड्डी जिल्ह्यात 13 डिसेंबरच्या संध्याकाळी म्हणजे मंगळवारी एक तरुण खाली पडलेला मोबाइल काढण्याच्या प्रयत्नात दोन मोठ्या खडकांमधल्या गुहेत अडकला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबरला सायंकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली. याची माहिती मिळताच दगड फोडण्यासाठी तत्काळ जेसीबी तैनात करण्यात आला, असं जिल्ह्याचे एसएसपी श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं.
15 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास त्या तरुणाच्या आजूबाजूला असलेले दगड फोडून त्याला वाचवण्यात आलं. गुहेतून बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलं. तरुणाच्या मित्राने सांगितलं, की गुहेत पडलेला त्याचा मोबाइल काढण्यासाठी तो आत गेला होता.
हे वाचा - अमित शहांनी बैठक घेऊन 24 तास उलटले नाही, बेळगावात कर्नाटक सरकारची गाडी फोडली
पोलीस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली होती. परंतु 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास याबद्दल गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. राजू मित्रासोबत घानपूर जंगलात शिकारीला गेला होता. त्या वेळी त्याचा फोन पडला आणि तो फोन शोधण्याचा प्रयत्न करू लागला. याच प्रयत्नात तो घसरून त्या दगडांमध्ये पडला आणि तिथेच अडकला. त्याच्या कुटुंबीयांनी तोपर्यंत त्याला पाणी आणि काही रेडी टू इट पदार्थ दिले होते, असंही एसएसपी श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं.
हे वाचा - महापुरूषांचा अपमान सहन केला जाणार नाही, सोलापुरात कडकडीत बंद
फोनसाठी जीव धोक्यात घालणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं असतं. नशीब बलवत्तर म्हणून, तो त्या खडकांमध्ये अडकला आहे, हे त्याच्या मित्राने गावकऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे त्याची सुटका झाली. अन्यथा काय झालं असतं, याची कल्पना करणं अवघड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile Phone, Telangana