नागपूर, 11 फेब्रुवारी : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात एका 47 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर त्याची पत्नी पसार झाली आहे. तसंच याच परिसरातून आणखी एक तरुण हा बेपत्ता झाला आहे. त्यामुळे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, एमआयडीसी परिसरातील शारदा नगर इथं ही घटना घडली आहे. शेखर असं मृत व्यक्तीचे नाव आहे. शेखर आपल्या पत्नीसह एमआयडीसी परिसरात राहत होता. पाच महिन्यांपूर्वीच त्याच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात गेला होता. मुलीच्या मृत्यूनंतर घरात पती आणि पत्नीमध्ये वाद होत होते. शेखर हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती. शेवटी शेखरच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी भावाकडे राहण्यासाठी निघून गेली होती.
भावाकडे काही दिवस राहिल्यानंतर मंगळवारी ती घरी परत आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शारदानगर येथील त्यांच्या घरी धाव घेतली. शेखर हा मृतावस्थेत बसलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पण, त्यानंतर शेखरची पत्नीही पसार झाली. याच परिसरात राहणारा पंकज नावाचा तरुणही बेपत्ता झाला होता. त्यामुळे अनैतिक संबंधातून शेखरची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शेखरच्या पत्नीचा पोलीस शोध घेत आहे.