पंढरपूर, 12 ऑगस्ट : स्वयंपाक नीट करता येत नाही, लग्नात जावयाचा मानपान केला नाही म्हणून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुजा महेश लिंगडे (वय-21, रा.जैनवाडी तालुका पंढरपूर) असं विवाहितेचे नाव आहे. सोमवारी सकाळी तिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
उस्मानाबादेत लॉकडाउनचा नवा आदेश, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ
पूजा हिचा विवाह 3 वर्षांपूर्वी जैनवाडी येथील महेश लिंगडे यांच्याशी झाला होता. तेव्हापासून तिला स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून आणि मान पानावरून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पूजा मागील काही दिवसांपासून कासेगाव(ता. पंढरपूर) येथील आई-वडिलांकडे राहत होती. परत सासरी नांदायला जायला तयार नव्हती. मात्र, पती महेश यांनी फोनवरून ' पुजाला आजच्या आज पाठवा, नाहीतरी परत नांदवणार नाही' असा निरोप दिल्याने भाऊ चैतन्य, आई आणि मामा यांनी मुलाबाळांसहीत पुजाला सासरी नेऊन सोडले होते.
नोकरी करण्याआधी तुमची मुलं होतील करोडपती! वाचा काय आहे योजना
त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी पुजाला मारहाण झाल्याचा फोन आला होता. परंतु, सकाळी बघू असे म्हणत पुजाची माहेरच्या लोकांनी समजूत काढली होती. पण दुसऱ्या दिवशीच 12 वाजता पुजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्या मंडळींना कळाली.
आपल्या लेकीने आत्महत्या केल्यामुळे माहेरच्या मंडळीने एकच आक्रोश केला. पुजाच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.