मुंबई, 03 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. बलात्कार, आत्महत्या तसेच हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कुणी प्रेयसीसाठी तर कुणी पैशांसाठी, स्वत:चीच हत्या घडवून आणल्याचा बनाव केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पुण्यातील घटना तर थरकाप उडवणाऱ्या आहेत. अशाच काही घटनांचा आढावा घेऊयात.
पुणे - स्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर...
पुण्यातील कोथरूडमध्ये आपला मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या भामट्याला कोथरूड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. कार चोरी केल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला होता. एवढेच नाही, तर मध्य प्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत बातमी छापून आणली होती. सतपासात चोरटा जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरूड भागात पंक्चरचे दुकान होते.
पुणे - स्वत:च्या मृत्यूचा बनाव करत प्रेयसीसोबत पळाला...
पुणे जिल्ह्यात आळंदी येथील चऱ्होली खुर्द या गावामध्ये अंत्यसंस्कार झालेला व्यक्तीच चक्क खुनाचा आरोपी निघाला. महिलेशी असणाऱ्या प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रवींद्र भिमाजी घेनंद (वय ४८, रा. धानोरे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती.
आरोपी सुभाष थोरवेचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याला महिलेसोबत लांब कुठे तरी जाऊन राहायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःचा मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने घेनंद यांना गोड बोलून शेतामध्ये नेले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत मानेपासून डोके वेगळे करून त्यांचा खून केला. त्यानंतर, स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घालून त्यांना रोलरमध्ये घालून फिरवले आणि अपघाताचा तसेच स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.
त्यानंतर थोरवे कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह शेतात पाहिला, तेव्हा त्या देहाला मुंडके नव्हते मात्र कपडे थोरवे यांचेच होते. त्यावरून थोरवे कुटुंबीयांनी हा मृतदेह थोरवे यांचा असल्याचे मान्य केले. एवढेच नाही त्यांचा दहाव्याचा कार्यक्रमही त्यांनी गावात घातला. मात्र, पोलीस तपासात हा आरोपी पोलिसांना दुसऱ्या गावात सापडला. तो थोरवे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आळंदी पोलिसांकडून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - Instagram वर मैत्री, मग लिव्ह-इन-रिलेशनशिप, आता महिलेने केला धक्कादायक आरोप
Insurance क्लेमसाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव
तेलंगणा पोलिसांनी सचिवालयातील वरिष्ठ सहाय्यकाला अटक केली आहे. बनावट मृत्यू दाखवून विम्याचा दावा करण्याचा त्याचा डाव होता. ही व्यक्ती तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील टेकमल मंडलातील वेंकटपूर गावाच्या हद्दीतील भीमला तांडा येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे नाव पथलोथ धर्मा असून तो सचिवालयात वरिष्ठ सहायक म्हणून काम करतो. हैदराबादमधील कुकटपल्ली येथे तो कुटुंबासह वास्तव्यास आहे. ऑनलाइन सट्टेबाजीत त्याचे मोठे नुकसान झाले, त्यासाठी त्याने कर्ज घेतले होते. नियमित उत्पन्नातून मोठं कर्ज फेडणं अशक्य झाल्याने त्याने ते फेडण्यासाठी कट रचला.
कर्जमुक्त होण्यासाठी त्याने मृत्यूचा बनाव केला. बनावट मृत्यू दाखवून त्याला विम्यामधून मिळणाऱ्या सात कोटी रुपयांचे कर्ज फेडायचं होतं. यासाठी त्याने कारमध्ये स्वतःला जिवंत जाळल्याचा सीन क्रिएट केला आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याने कारमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीला जिवंत जाळले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी त्याने स्वतःचा बनावट मृत्यू घडवून आणला आणि त्यासाठी त्याने त्याच्या ड्रायव्हरची हत्या करून मृतदेह आपल्या कारमध्ये ठेवला.
बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि 11 कोटी रुपयांचा विमा -
11 कोटी रुपयाच्या दोन जीवन विमा पॉलिसींचा दावा करण्यासाठी एका पाकिस्तानी महिलेने फसवणूक करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी (एफआयए) नुसार, सीमा खरबे नावाच्या महिलेने 2008 आणि 2009 मध्ये यूएसला प्रवास केला आणि तिच्या नावावर दोन वजनदार जीवन विमा पॉलिसी खरेदी केल्या. 2011 मध्ये, सीमा पाकिस्तानातील काही सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन तिच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झाली. मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तिने एका डॉक्टरला लाच दिली होती. सीमा यांच्याकडे कागदपत्रेही मिळाली ज्यात तिला पुरण्यात आल्याचे दिसून आले. या बनावट कागदपत्रांचा वापर सीमा यांच्या मुलांनी दोन जीवन विमा पॉलिसी पेआउट्सचा दावा करण्यासाठी केला होता, असे एफआयए अधिकाऱ्याने पीटीआयने सांगितले.
मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सीमाने कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाकिस्तानबाहेर प्रवास करणे सुरूच ठेवले, वरवर पाहता तिची ओळख पटली नाही. विमानतळ अधिकारी तिचा खोटेपणा उघड करण्यात अपयशी ठरले. "तिने सुमारे पाच देशांना भेट दिली, परंतु प्रत्येक वेळी ती मायदेशी परतली," असे अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता सीमा, तिचा मुलगा, मुलगी आणि काही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी एफआयएने कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.