सोलापूर, 22 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारच्या सुमारास एका अज्ञात चोराने घरात घुसून 9 महिन्याच्या चिमुकल्याचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली असून याबाबत बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक स्वानंद तुपे असं या खून झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तर अश्विनी तुपे असे या पीडित आईचं नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आईसमोरच तिच्या पोटच्या गोळ्याचा गळा आवळण्यात आला. त्यामुळे आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईने क्षमायाचना केली. मात्र तरीही हल्लेखोराने बाळाचा गळा आवळून बाळाला जमिनीवर टाकले आणि बाळाच्या आईलाही मारहाण करुन तिचे हातपाय बांधून घरातील कपाट उचकटले.
कपाटात काहीच न मिळाल्याने आईच्या गळ्यातील 2 ग्रॅम सोन्याचे गंठन चोराने लांबवल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.
हत्येनंतर अज्ञात आरोपी हा घरासमोरील शेतात पळून गेला. पीडित महिलेचा पती हा ट्रकचालक असून तो चार दिवसापासून बाहेरगावी गेलेला होता. तर दीर आनंद तुपे यांनी याबाबत बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान 302, 394, आणि 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी चार ते पाच पथकं रवाना झाली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.