नवी दिल्ली, 08 डिसेंबर : खेड्यापाड्यातल्या लहान मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून शासनानं माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे; मात्र झारखंडमध्ये हीच योजना दोन लहान मुलींच्या जीवावर बेतली आहे. झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यात भाताच्या पेजेने भरलेल्या टबमध्ये पडून अंगणवाडी केंद्रातल्या दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरहसी ब्लॉकच्या सेलारी पंचायतीअंतर्गत येणाऱ्या छेचनी मिडल स्कूलमध्ये ही घटना घडली. ब्युटी कुमारी आणि शिबू अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर साहू नावाच्या स्थानिक गावकऱ्याच्या या मुली होत्या. अंगणवाडी केंद्राजवळच्या सेल्लारी पंचायतीच्या छेचनी मिडल स्कूलमध्ये माध्यान्ह भोजन शिजल्यानंतर तांदळाची गरम पेज एका उघड्या टबमध्ये ठेवलेली होती. त्या ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रात शिकणारी मुलं खेळता खेळता या टबजवळ आली. त्या वेळी दोन बहिणी त्या गरम पेजेत पडल्या.
हे ही वाचा : भयंकर! 8 वर्षाच्या मुलीवर निर्घृण अत्याचार करून जाळलं; आरोपीही अल्पवयीन
या घटनेत भाजलेल्या मुलांना अगोदर मेदिनीनगरच्या मेदिनी राय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (MRMCH) दाखल करण्यात आलं होतं; मात्र त्यांची प्रकृती फार गंभीर असल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (RIMS) हलवण्यात आलं होतं.
तरहसी ब्लॉकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सच्चिदानंद महतो यांनी सांगितलं, की दोघींपैकी लहान बहीण ब्युटी कुमारीचा मंगळवारी (6 डिसेंबर) संध्याकाळी मृत्यू झाला. मोठी बहीण शिबू हिचा बुधवारी (7 डिसेंबर) रांची येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना अधिकाऱ्यानं सांगितलं, की दोन्ही मुलींना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले; पण त्यात यश आलं नाही.
शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी परमेश्वर साहू यांनी शाळेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका उमा देवी यांना मुख्याध्यापक पदावरून हटवलं आहे. सोबतच त्यांना कारणं दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. माध्यान्ह भोजन समन्वयक शोभा देवी आणि स्वयंपाकी कालो देवी व सविता देवी यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.
हे ही वाचा : जळगाव: दुकानात जात असल्याचं सांगून गेलेला तरुण परतलाच नाही; सत्य समजताच हादरली आई
दरम्यान, सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. काही ठिकाणी लहान मुलं भोजनाच्या भांड्यांमध्ये पडून भाजतात तर काही ठिकाणी भोजनामध्ये अळ्या आढळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news