अखेर 28 वर्षांनी सिस्टर अभयाला मिळाला न्याय; कसा लागत गेला कटाचा सुगावा, वाचा सविस्तर

अखेर 28 वर्षांनी सिस्टर अभयाला मिळाला न्याय; कसा लागत गेला कटाचा सुगावा, वाचा सविस्तर

यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार ठरलेल्या अडाक्का राजू या चोरानं या खटल्याचा निकाल लागल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

  • Share this:

तिरूवनंतपुरम, 23 डिसेंबर : तब्बल 28 वर्षे 9 महिने इतका प्रदीर्घ काळ चाललेल्या कोट्टायम (Kottaym) इथल्या सिस्टर अभया (Sister Abhaya) हत्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. सिस्टर अभया या 19 वर्षांच्या कॅथलिक ननच्या दोघा मारेकऱ्यांना तिरूवनंतपुरम इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाचे (Special CBI Court) न्यायाधीश के. सनाल कुमार यांनी शिक्षा सुनावली. हा सर्वांत प्रदीर्घ काळ चाललेला खटला होता.

71 वर्षांचे नैतिक धर्मशास्त्राचे अभ्यासक प्रिस्ट थॉमस कोट्टोर (Thomas Kottor) आणि 57 वर्षांच्या सिस्टर सेफी (Sister Sefi) यांनी सिस्टर अभया हिची हत्या केल्याचं मंगळवारी न्यायालयात सिद्ध झालं आणि तब्बल 28 वर्षे 9 महिन्यानंतर सिस्टर अभयाला न्याय मिळाला.

या खटल्यामध्ये तब्बल 177 साक्षीदार होते, त्यापैकी अनेकजण फितूर झाले तर अनेकजण मरण पावले. शेवटी या हत्याकांडाचा मुख्य साक्षीदार असलेला अडाक्का राजू या भुरट्या चोराची साक्ष खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाणारी ठरली. राजू कॉन्व्हेन्टच्या परिसरात तांब्याची तार चोरण्यासाठी शिरला होता, त्यावेळी त्याने अभयाला या तीन व्यक्ती मारत असल्याचं पाहिलं. सीबीआय समोरही त्यानं दोन प्रिस्ट आणि एक नन यांना अभायाच्या ह्त्येच्यावेळी कॉन्व्हेन्टच्या परिसरात पाहिल्याचं सांगितलं.

कोट्टायम इथल्या बीसीएम कॉलेजमध्ये शिकणारी आणि क्नानया कॅथलिक कम्युनिटीची सदस्य असलेली सिस्टर अभया ही 19 वर्षांची मुलगी 27 मार्च 1992 रोजी हॉस्टेलच्या किचनमध्ये पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आली होती. त्या वेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढून ही केस बंद केली होती, मात्र ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करत, चर्च अभयाच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते (Social Activist) जोमोन पुथानपुरक्कल यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयकडं (CBI) सोपवण्याची मागणी केली. यासाठी मोर्चे, निदर्शनं करण्यात आली होती. दी क्नानया कॅथलिक आर्चेपारची ऑफ कोट्टायम ही सायरो मलबार कॅथलिक चर्चची संस्था आहे. सीबीआयनंही आपल्या पहिल्या तीन तपास अहवालांमध्ये ही होमिसायडल सुसाईड अर्थात आत्महत्येची केस असल्याचे म्हटले होते, पण सीबीआय न्यायालयानं हा अहवाल फेटाळत नव्यानं तपास करण्याचे आदेश दिले. 2008 मध्ये सीबीआयनं ही हत्या असल्याचा अहवाल देत, या प्रकरणी प्रिस्ट थॉमस कोट्टोर, प्रिस्ट जोसे पूथरुकयील आणि सिस्टर सेफी यांना अटक केली.

सिस्टर अभया हिनं काहीतरी सेक्श्युअल अॅकटीव्हीटी होताना पाहिली आणि ती तिनं उघड करू नये यासाठी या तिघांनी तिची हत्या केल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं आहे. सिस्टर अभया हिच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले आणि नन्तर तिला विहिरीत टाकण्यात आलं. 27 मार्च 1992 रोजी पहाटे 4.15 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात नमूद केलं आहे. प्रिस्ट थॉमस कोट्टोर अभयाला बीसीएम कॉलेजमध्ये सायकोलॉजी शिकवत असत, तसेच ते बिशपचे सेक्रेटरी होते, नंतर ते कोट्टायम कॅथलिक दिओसेसचे कुलगुरूही बनले. सीबीआयनं या तिघांवर अभया हिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा आणि कारस्थान रचल्याचा आरोप ठेवला होता. त्यांच्यापैकी प्रिस्ट जोसे पूथरुकयील याची पुराव्या अभावी न्यायालयानं गेल्या वर्षी मुक्तता केली.

यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार ठरलेल्या अडाक्का राजू या चोरानं या खटल्याचा निकाल लागल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ‘अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला. अभयाच्या वडिलांच्या जागी असल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यामुळं मला खूप समाधान वाटत आहे. मला साक्ष मागं घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लालूच दाखवण्यात आली; पण मी एकही पैसा घेतला नाही. माझ्या कुटुंबासोबत माझ्या तीन गुंठे जमिनीवर मी आनंदात जगत आहे,’ असं राजू यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या केसचा तपास करणारे तत्कालीन डीवाय एसपी वर्गीस पी थॉमस यांनी ही केस आत्महत्या म्हणून दाखवावी यासाठी वरिष्ठांकडून प्रचंड दबाव येत असल्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता. चर्च आणि राजकारणी लोकांचा हस्तक्षेप यामुळं या केसचा निकाल लागण्यास इतका उशीर झाल्याचं त्यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या प्रकरणातील काही महत्वाच्या घडामोडी  :

  27 मार्च 1992 : कोट्टायम अरीक्कारा इक्काराक्कुन्नेल आणि लीलम्मा यांची मुलगी सिस्टर अभया हिचा मृतदेह सेंट पायस एक्स कॉन्व्हेंटच्या विहिरीत सापडला.

31 मार्च 1992 : स्थानिक पोलिसांनी ही केस आत्महत्येची म्हणून दडपल्याचा आरोप केल्यानं कोट्टायम महापालिकेचे अध्यक्ष पीसी चेरियन मदुक्कानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि समन्वयक म्हणून जोमोन पुथेनपुरुक्कल यांची एक कृती समिती नेमण्यात आली.

30 जानेवारी 1993 – केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास बंद करून अहवाल कोट्टायम आरडीओकडं दिला.

23 मार्च 1993 : ही केस सीबीआयकडं सोपवण्यात आली.

सप्टेंबर 1996 : सीबीआयनं ही आत्महत्या असल्याचा पहिला अहवाल दिला. न्यायालयानं तो फेटाळत पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले.

मार्च 1997 : सीबीआयनं ही आत्महत्या नव्हे तर होमिसाईड असल्याचा दुसरा अहवाल दिला. तोही न्यायालयानं नाकारला.

2007 : सीबीआय एस पी नंदकुमार यांनी या प्रकरणाच्या  तपासाची सूत्रे स्वीकारली.

डिसेंबर 2008 : एर्नाकुलम इथल्या न्यायालयात तिसरा अहवाल दाखल केला आणि त्यात ही हत्या असल्याचं सांगितलं. या प्रकरणी प्रिस्ट थॉमस कोट्टोर, प्रिस्ट जोसे पूथरुकयील आणि सिस्टर सेफी यांच्यावर हत्या, पुरावे नष्ट करणे आणि इतर आरोप ठेवले.

सिस्टर अभया हिनं काहीतरी सेक्श्युअल अॅकटीव्हीटी होताना पाहिली आणि ती तिनं उघड करू नये यासाठी या तिघांनी कुऱ्हाडीने तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत टाकला असं सीबीआयनं आरोपपत्रात नमूद केलं.

2008 : सेफी यांनी सीबीआयनं जबरदस्तीनं त्यांची व्हर्जिनिटी चाचणी केल्याचा आरोप करत, सीबीआय विरुद्ध तक्रार केली. न्यायालयानं ही तक्रार फेटाळली.

जानेवारी 2009 : तिघाही आरोपींनी सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर जामीन मंजूर झाला.

17 जुलै 2009 : सीबीआयनं तिघांविरुद्ध आरोप पत्र दाखल केलं.

14 सप्टेंबर 2009 : तिघा आरोपींच्या नार्को टेस्टच्या टेप्स प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झाल्या.

7 मार्च 2018 : पुराव्या अभावी जोसे पुथरुकायील याची न्यायालयानं मुक्तता केली.

26 ऑगस्ट 2019 : 27 वर्षांनी या केसची सुनावणी सुरू झाली. अनेक साक्षीदार फितूर झाले.

19 सप्टेंबर 2019 : अभायाला कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या निवृत्त प्राध्यापक थेरेसिमा जॉर्ज यांना सीबीआयनं साक्षीदार म्हणून हजर केलं. त्यांनी थॉमस कोट्टोर यांच्यावर गंभीर आरोप केले.

21 डिसेंबर 2020 : विशेष सीबीआय न्यायालयानं प्रिस्ट आणि नन यांना दोषी ठरवलं.

Published by: Meenal Gangurde
First published: December 23, 2020, 7:04 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या