नवी दिल्ली, 7 मार्च : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्लीतल्या कोर्टात सुनावणी पार पडली. या खटल्यातला प्रमुख आरोपी आफताब अमीन पुनावालाच्या आरोपांवरचा युक्तीवाद न्यायालयात पार पडला. आफताबवर त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा आणि तिच्या शरिराचे तुकडे-तुकडे केल्याचा आरोप आहे. आफताब पुनावाला ताज हॉटेलमध्ये प्रोफेशनल कुक आहे, त्याला मांस कसं संरक्षित केलं जातं ते माहिती आहे, असा दावा पोलिसांनी साकेत कोर्टात केला.
दिल्लीच्या साकेत कोर्टात आता पुढची सुनावणी 20 मार्चला होणार आहे. आफताब प्रोफेशनल कुक असल्यामुळे त्याला मांस संरक्षित कसं करायचं हे माहिती आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने सुका बर्फ, अगरबत्ती सारखं सामान मागवलं होतं. दरम्यान आफताबने त्याचा वकील बदलला आहे, त्यामुळे वकिलाने उत्तर द्यायला वेळ मागितला आहे.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबला अजिबात दु:ख झालं नाही. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब नव्या मुलीच्या प्रेमात पडला आणि तिला आफताबने अंगठी गिफ्ट म्हणून दिली, असा दावा पोलिसांनी केला आहे. ज्या घरी श्रद्धाची हत्या करण्यात आली तिकडेच आफताबची नवी प्रेयसी त्याला भेटायला यायची, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.
आफताब माझी तुकडे-तुकडे करून हत्या करेल, अशी तक्रार श्रद्धा वालकरने महाराष्ट्र पोलिसांकडे केली होती. आफताबने तशाच पद्धतीने श्रद्धाचा गळा दाबून आणि तिचे 35 तुकडे करून हत्या केली, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांचे वकील अमित प्रसाद यांनी कोर्टात केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.