दिल्ली, 10 जून: कुस्तीपटू सागर धनखड
(Sagar Dhankar) हत्या प्रकरणातऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार
(Sushil Kumar) याची विशेष मागणी दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. सुशील कुमारनं जेलमध्ये विशेष भोजन मिळावे अशी मागणी केली होती. या मागणीला कोणताही ठोस कायदेशीर आधार नसल्याचे सांगत मुख्य न्यायदंडाधिकारी सतवीर सिंह लांबा यांनी ही मागणी फेटाळली. आपल्याला यापुढे देखील कुस्तीमध्ये करियर करायचे आहे. त्यामुळे शारीरिक मजबूतीसाठी जेलमध्ये विशेष प्रोटीनयुक्त आहार देण्यात यावा अशी मागणी सुशील कुमारनं केली होती.
कोर्टाने विचारला प्रश्न
सुशील कुमारचा हा अर्ज फेटाळताना कोर्टाने त्याचे कारण सांगितले आहे. "सुशीलनं कुस्तीमध्ये पुढे करियर करायचे असल्याचा दावा केला आहे. मात्र कोणत्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे, हे सांगितले नाही. तुरुंगातील सर्व कैद्यांना नियमांच्या आधारे भोजन दिले जात असल्याचे जेल प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे सुशीललाही कोणत्याही भेदभावाशिवाय संतुलित आणि पोषक टाएट दिले जाईल.'
कायद्यासमोर सर्व समान
यावेळी कोर्टाने 'कायद्यासमोर सर्व समान' या तत्वाचा उल्लेख केला. तो व्यक्ती कोणत्याही धर्म, जात, लिंग किंवा वर्गाशी संंबंधित असला तरी समानतेचा अधिकार हे घटनेचे मुळ तत्व आहे. याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला त्याचे पद आणि स्तर याच्या आधारे विशेष सुविधा न देणे देखील आहे. व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब कायदा सर्वांसाठी समान आहे.
विशेष भोजन आणि आहार ही गोष्ट केवळ आरोपीची आवड आणि इच्छा याच्याशी संबंधित आहे. ती कोणत्याही प्रकारे योग्य नाही.' असे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.
15 दिवसामध्ये पैसे दुप्पट करण्याचा फंडा, Chinese App ने केली 250 कोटी रुपयांची फसवूणक
यापूर्वी 'सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार पुरेसा नाही. आपल्या डाएटचा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त खाणे द्यावे, अशी मागणी सुशीलने केली होती. आपण एक कुस्तीपटू असून त्यामुळे आपल्यासाठी सामान्य व्यक्तींना दिले जाणारे जेवण पुरेसे नाही. त्यासाठी प्रोटीनयुक्त विशेष खुराक आवश्यक आहे, असा दावा या अर्जामध्ये करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.