आग्रा, 17 मार्च: गेल्यावर्षी पालघरमध्ये जमावाने चोरीच्या संशयातून दोन साधूंची हत्या (Sadhu Murder in Palghar) झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका साधूच्या संदिग्ध हत्येनं खळबळ उडाली आहे. काही अज्ञात लोकांनी धारदार शस्त्राने साधूची हत्या (Sadhu murder in Agra) केली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील ताज नगरीतील एका साधूच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराच्या आवारात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन अज्ञातांनी त्यांची निर्घृण हत्या केली आहे. ही हत्येची घटना न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जंगलात एक हनुमानाचं मंदिर बांधलं गेलं आहे. या मंदिरात मृत साधू शिव गिरी पूजा पाठ करायचं काम करत होते, तसेच ते मंदिराच्या आवारातच वास्तव्याला होते.
बुधवारी पहाटे काही स्थानिक लोकांनी पाहिलं की, साधू रक्ताने माखलेल्या अवस्थेत मंदिराच्या आवारात पडून आहेत. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. या साधूची हत्या कोणी केली आणि का केली? याचं गुढ कायम असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
हे वाचा - देशाला हादरावून सोडणाऱ्या पालघर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
या घटनेची माहिती देताना आग्रा सीटीचे एसपी रोहन पी बोत्रे यांनी सांगितलं की, संबंधित साधूची हत्या कुऱ्हाडीने वार करून करण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तयारी करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सध्या या हत्येमागील गुढ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक्स टीमलाही पाचारण केलं आहे.
हे वाचा - युपीत साधूंच्या हत्येप्रकरणावरून संजय राऊतांनी भाजप नेत्यांचे टोचले कान, म्हणाले...
चोरी किंवा लुटमारीच्या हेतुने ही हत्या झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोणी तरी ओळखीच्या व्यक्तीनं ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या हत्येचा खुलासा करण्यासाठी सर्व्हिलन्सची टीमलाही तैनात केलं आहे. ही टीम साधूच्या मोबाइलचे सखोल परिक्षण करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agra, Crime, Crime news, India, Murder