कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता न्यायालयातही व्हावं लागणार हजर

कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता न्यायालयातही व्हावं लागणार हजर

मालकाच्या हत्येप्रकरणी या कोंबड्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर या गुन्ह्यामुळे त्याला न्यायालयात हजरही व्हावं लागणार आहे.

  • Share this:

हैदराबाद 28 फेब्रुवारी : तेलंगणामध्ये एका कोंबड्याला (Rooster) आपल्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. ही घटना राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील गोलापल्लीची आहे. सध्या या कोंबड्याला पोलिसांच्या ताब्यात (Police Custody) ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या गुन्ह्यामुळे त्याला न्यायालयात हजरही व्हावं लागणार आहे. मात्र, एखादा कोंबडा कायदेशीर प्रक्रियेतून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील जानेवारीतही दोन कोंबड्यांना 10 लोकांसह तीन दिवस लॉकअपमध्ये ठेवलं गेलं होतं.

हे प्रकरण 22 फेब्रुवारीचं आहे. गोलापल्लीमध्ये मंदिराजवळ कोंबड्यांची लढाई होणार होती. याचसाठी पोल्ट्री चालवणारे 45 वर्षाचे टी सतैयादेखील तयारी करत होते. अशा लढायांसाठी कोंबड्यांना तयार करण्यात त्यांना उत्तम समजलं जातं. सकाळी ते कामावर आले आणि कोंबड्याच्या पायात 3 इंचाचा चाकू बांधला. त्यांनी पहिल्या कोंबड्याला खाली ठेवून दुसऱ्याला हातात घेण्याचा प्रयत्न करताच तो चाकू खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला. याच दरम्यान चुकून हा चाकू सतैया यांच्या कमरेला लागला.

पोलिसांनी सांगितलं, की यानंतर सतैया यांच्या शरीरातून प्रचंड रक्त येऊ लागलं. रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाकू आणि जप्त केलेल्या कोंबड्याचे फोटोही घेतले गेले आहेत. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही दोन दिवस या कोंबड्याला पोलीस ठाण्यात ठेवलं. मात्र, नंतर त्याला जवळच्याच एका पोल्ट्री फार्ममध्ये पाठवलं. न्यायालयानं आदेश दिल्यास त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. सतैया यांच्या पत्नीनं सांगितलं, की अशा लढायांमध्ये ते नेहमीच सामीस व्हायचे. प्रत्येक लढाईची त्यांना 1500 ते 2000 रुपये मिळायचे.

तेलंगणामध्ये कोंबड्याची लढाई अवैध आहे. मात्र, अनेकठिकाणी गुप्तपणे आजही याचं आयोजन केलं जातं. या लढाईमध्ये एका दोन कोंबड्यांना एकामेकांसमोर लढाईसाठी सोडलं जातं. इथे त्यांच्यावर लाखो रुपयांची पैज लावली जाते.

Published by: Kiran Pharate
First published: February 28, 2021, 8:18 AM IST

ताज्या बातम्या