पारनेर, 21 मे: काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची निर्घृण हत्या (Rekha Jare murder) करण्यात आली आहे. यानंतर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. आरोपी बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याठिकाणी त्यानं आणखी एक कारनामा केल्याचं उघड झालं आहे. यामुळे आरोपी बोठे याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आरोपी बोठे यानं पारनेर येथील दुय्यम कारागृहात मोबाइल फोनचा वापर केल्याचं (Bal Bothe used mobile in Jail) निष्पन्न झालं आहे. यानंतर आरोपी बोठेवर आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे.
आरोपी बाळ बोठे याच्या अन्य तीन कैद्यांनी कारागृहात मोबाइल फोनचा वापर केल्याचं निष्पन्न झालं आहे. 25 एप्रिल रोजी रात्री दीड वाजता अजित पाटील यांनी कारागृहाला भेट देऊन कैद्यांची अचानक तपासणी केली होती. यावेळी कारागृहातील सौरभ पोटघन आणि अविनाश कर्डिले या दोन आरोपींकडे मोबाइल फोन सापडले होते. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली होती. तसेच कारागृह प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
संबंधित आरोपींकडे सापडलेल्या फोनवरून बाळ बोठे यानं देखील बाहेर संपर्क साधला असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता बाळ बोठे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
मोबाइल कारागृहात कसा पोहोचला?
संबंधित मोबाइल फोन कैद्यांना जेवण पुरवणारे सुभाष लोंढे आणि प्रवीण देशमुख यांनी आणून दिल्याचं आरोपींनी कबुल केलं आहे. कैद्यांना जेवण पुरवणारे ठेकेदार लोंढे यांच्याकडे काम करणारे वसंत गुंजाळ आणि दुसरा ठेकेदार देशमुख यांच्याकडे काम करणारे दादासाहेब गायकवाड आणि त्यांची पत्नी अश्विनी यांच्याद्वारे हे मोबाइल फोन कैद्यांना देण्यात आले असल्याचं तपासात उघड झालं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news