जयपूर, 12 डिसेंबर: जादूटोणा, भोंदूगिरी याला बळी पडणाऱ्यांची संख्या देशात कमी नाही. हे सर्व अघोरी प्रकार बंद व्हावेत यासाठी कायदा करावा म्हणून आंदोलनं झाली. सरकारनं कायदा देखील केला. मात्र, अजूनही सर्वसामान्य जनता या भोंदूबाबांना बळी पडत आहे. या प्रकारचे गुन्हे हे दिवसोंदिवस वाढत असून याला बळी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलांचं प्रमाण मोठं आहे.
राजस्थानमधल्या (Rajasthan) बारमेर (Barmer) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गावातल्या एका मांत्रिकानं आधी 10 वर्षांच्या मुलीला जाळलं आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हे वाचा-तंत्रविद्येपायी आईनेच मुलाचा घेतला जीव; तूप-मसाले टाकून जाळलं, हाडांची मोळी...
पाकिस्तानी मांत्रिकाचे कृत्य
‘या घटनेचा सूत्रधार असलेला मांत्रिकाचे नाव भील असून तो पाकिस्तानच्या सीमेवर (India – Pak Border) असलेल्या बाखासर या गावाचा होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा मांत्रिक पाकिस्तानी शरणार्थी होता तसेच गेल्या दोन वर्षांपासून गावात राहात होता. त्याने घरामध्ये मांत्रिक समाधी केंद्र बनवले होते. त्याच्या घरामधून तंत्रविद्येचे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मांत्रिकाला गावातील कोणते नागरिक मदत करत होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये देखील चार दिवसांपूर्वी असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. बुलंदशहरातील एका कब्रीमध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या प्रकारात देखील तंत्रविद्येचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. आजारपणामुळे या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.