लंडन, 12 डिसेंबर: आतापर्यंत आपण अशा घटना ऐकल्या असतील की चाकूचा धाक दाखवून पैसे, दागिने यांची चोरी केली गेली. पण चाकुचा धाक दाखवून कुत्र्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेला धमकावून आणि चाकूचा धाक दाखवून कुत्रा (Dog) चोरल्याची घटना घडली आहे. लंडनमधील (London) बेलमोंट रोड परिसरात ही घटना घडली असून येथील एक महिला कुत्र्याला सकाळच्या वेळेत सैर करण्यासाठी बाहेर घेऊन गेली होती. त्यावेळी चोरांनी धमकावून तिच्या कुत्र्याची चोरी केली आहे. अनेकदा चोर चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू किंवा पैशांची चोरी करतात परंतु या चोराने चाकूचा धाक दाखवून कुत्र्याची चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ही महिला सकाळी सातच्या दरम्यान आपल्या कुत्र्याला घेऊन बाहेर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेली होती. त्यावेळी चोरांनी चाकूचा धाक दाखवत तिच्या सहा महिन्यांच्या कुत्र्याची चोरी केली. या कुत्र्याचे नाव 'वेफल' असून या महिलेने यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
(हे वाचा-बायडन राष्ट्रपती झाल्यावर मुलाबाबत समजल्या धक्कादायक गोष्टी; जाणून घ्या प्रकरण)
डेवॉन आणि कॉर्नवाल पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, या महिलेला एका व्यक्तीने फोन करून कुत्र्याला त्यांच्या ताब्यात सोपवण्याची धमकी दिली होती. तसंच कुत्र्याला त्याच्या ताब्यात न दिल्यास चाकूने मारण्याची देखील धमकी दिली होती. त्यानंतर थेट चाकूचा धाक दाखवून चोरी करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या काही दिवस आधी ही घटना घडल्याने या महिलेचं कुटूंब खूप दु:खात असून पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.
(हे वाचा-Google Maps चा शॉर्ट कट पडला महागात; 17 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिग्ध व्यक्तीची उंची 5 फूट 8 इंच असून त्याने काळ्या रंगाची हुडी घातली होती. त्याचबरोबर या महिलेने चोरी करणारा इसम परदेशी भाषेत बोलत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. पोलीस सार्जंट स्टीव्ह व्हाइट यांनी या प्रकरणी संवेदना व्यक्त केल्या असून या प्रकरणी त्यांच्या पाळीव कुत्र्याची चोरी झाल्याने कुटुंबीय दु:खी असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तपास करत असलेले सर्व पोलीस आणि मी त्यांच्या दुःखात त्यांच्याबरोबर असून चोरी करणारा व्यक्ती हा त्यांचा नातेवाईक, कौटुंबिक मित्र किंवा शेजारील व्यक्ती असू शकते जो वेफल याला ओळखत असावा. त्याचबरोबर पोलीस या चोराचा शोध घेत असून लवकरच चोराचा शोध लागण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.