पंजाब, 16 सप्टेंबर : भारतीय टीमचा माजी सुरेश रैना (Suresh Raina) याच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता आणि आत्या, आत्तेभाऊ गंभीर जखमी होते. उपचारादरम्यान रैनाच्या भावाचाही मृ्त्यू झाला. अखेर या प्रकरणाचा पंजाब पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी पंजाब पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगाराची टोळीतील सदस्य आहे. या प्रकरणातील आणखी 11 आरोपी फरार आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला झाला होता. हे कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केले होते.या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला तर काकू आशा देवी या गंभीर झाल्या होत्या. तर या हल्लात गंभीर जखमी झालेल्या चुलत भाऊ कौशलचा मृत्यू झाला.
दुबईला गेलेला सुरेश रैना या घटनेमुळे भारतात परत आला होता. त्याने पंजाबमध्ये जाऊन आपल्या नातेवाईकांची भेट घेतली. या प्रकरणात पंजाब पोलीस चांगले काम करत आहे. लवकरच ते आरोपींना पकडतील, अशी प्रतिक्रिया रैनाने दिली होती.
दरम्यान, या प्रकरणात आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून रैनाने मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे मदत मागितली होती. रैनाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडेही मागणी केली होती. 'आतापर्यंत आम्हाला माहिती नाही की त्या रात्री काय घडले होते. मी विनंती करतो की, त्या दिवशी नेमकं माझ्या नातेवाईकांसोबत काय घडलं होतं, हे कृत्य कुणी केले, याची माहिती द्यावी. जे कुणी हे कृत्य केले आहे. त्या आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे', अशी मागणी रैनाने केली होती.
19 ऑगस्ट रोजी सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला झाला होता. नेहमीप्रमाणे त्याचे नातेवाईक हे घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यावेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याने हल्ला केला होता.